कॉंग्रेसकडून ‘ऑपरेशन लोटस’ फत्ते;भिवंडी महापौरपदी सेक्युलर फ्रन्टचे नारायण चौधरी यांची निवड
मुंबई/प्रतिनिधी-भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष आघाडीचे (सेक्युलर फ्रंट) उमेदवार नारायण चौधरी विजयी झाले. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली. अखेर भाजपमधील बंडखोरीमुळे सत्तासमीकरण बदलले आणि भाजपला मोठा धक्का बसला.
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या निवडणुक निकालानंतर एकुण 90 जागांपैकी कॉंग्रेसकडे 30 नगरसेवक तर भाजपचे 22, शिवसेना 12, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडी 4 जागा, भिवंडी विकास आघाडी 3 जागा, इतर 1 असे पक्षीय बलाबल निर्माण झाले होते. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक त्या 46 हून जास्त जागा कोणत्याही एका पक्षाला मिळाल्या नव्हता. महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि.20 फेब्रुवारी 2026) निवडणूक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांमध्ये आघाड्या-युतींसाठी वेगाने हालचाली सुरू होत्या. या निवडणुकीच्या सुरुवातीला कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेवकांनी अर्ज मागे घेण्यासाठी मुदतवाढ मागितली; मात्र पीठासीन अधिकार्यांनी ती मागणी फेटाळली.एकूण 10 उमेदवारांपैकी 7 जणांनी माघार घेतल्यानंतर नारायण चौधरी, स्नेहा पाटील आणि विलास पाटील हे तिघे उमेदवार अंतिम फेरीत राहिले. मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावला होता.दरम्यान, भाजपचे सुरुवातीचे अधिकृत उमेदवार असलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी उमेदवारी बदलावर नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली. त्यांनी समर्थक नगरसेवकांसह कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसने त्यांना महापौरपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केले. उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसकडून तारिक मोमिन यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.भाजपकडून स्नेहा मेहुल पाटील (महापौर) आणि सुहास नकाते (उपमहापौर) यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे भाजपची गणिते बिघडली. व्हीप मोडणार्या नगरसेवकांवर काय कारवाई होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या निकालामुळे भिवंडीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, त्याचे पडसाद राज्याच्या स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरु
निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी सुचना जारी
मुंबई/प्रतिनिधी-राज्यातील मुदत संपणार्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम आज 20 फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आजपासून तहसिलदारांना गावनिहाय नकाशे अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत कार्यकाळ संपणार्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी प्रभाग रचनेची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रथम टप्प्यात गावांचे नकाशे निश्चित केले जाणार असून, त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक प्रत्यक्ष पाहणी करून वॉर्डांच्या सीमा ठरवतील. पुढे जिल्हाधिकारी स्तरावर पडताळणी होऊन प्रारूप प्रसिद्ध केले जाईल व नागरिकांकडून हरकती मागवण्यात येतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.निवडणूक कार्यक्रमाची औपचारिक घोषणा झाल्याने ग्रामपंचायत स्तरावर हालचालींना वेग आला असून, स्थानिक राजकीय वातावरणातही चैतन्य निर्माण झाले आहे.
==================
लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात
बीड:सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला असून एसीबीच्या छाप्यात हा उघड झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पडकल्याची घटना ताजी असतानाचा, आता, बीड जिल्ह्यातील परळीतून लाचप्रकरणाची मोठी घटना समोर आली असून चक्क तहसीलदारच जाळ्यात अडकला आहे.
परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकार्यांचे, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे अनेक दिवस नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे कार्यरत होते.

0 تعليقات