Header Ads Widget

नांदेडचे रस्ते आणि कैलास खेरांचा सूर



नांदेड-नांदेडचे रस्ते आणि कैलास खेरांचा सूर

 शहराला सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केला जाणारा कुसुम महोत्सवही त्या परंपरेचीच एक झलक आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील नामवंत गायक, संगीतकार आणि कलावंत नांदेडकरांच्या भेटीला येतात. शास्त्रीय आणि आधुनिक संगीताची मेजवानी मिळाल्याने नांदेडकर रसिकही आनंदित होतात. यंदा या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या गायनाने सभागृह भारावले खरे; पण कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी नांदेडच्या रस्त्यांबाबत व वाहतुकी संदर्भात व्यक्त केलेली प्रतिक्रिया मात्र सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

कैलास खेर यांनी आपल्या शैलीत, पण अत्यंत स्पष्ट शब्दांत नांदेडमधील रस्त्यांची अवस्था पाहून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला. एखाद्या बाहेरच्या पाहुण्याने शहराच्या जखमेवर बोट ठेवले की ते अधिक बोचते, हेच यावेळी घडले. परंतु प्रश्न असा आहे की, त्यांनी काही खोटे बोलले का? दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी नांदेडचे प्रतिनिधित्व करत राज्यात मुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. केंद्रातही त्यांनी गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री अशा जबाबदार्‍या पार पाडल्या. त्यांच्या काळात विष्णुपुरी प्रकल्पासारखी कामे झाली आणि काही उद्योगधंदेही नांदेडकडे वळले. शहराच्या विकासाला त्यांनी दिशा दिली, हे नाकारता येणार नाही. यानंतर अशोक चव्हाण यांनीही राज्यात विविध मंत्रीपदे सांभाळली आणि दोनदा मुख्यमंत्रीपदाची धुरा पेलली. मात्र त्यांच्या कार्यकाळात नांदेडला मोठा उद्योग किंवा दीर्घकालीन विकास प्रकल्प मिळाला, असे ठामपणे सांगणे कठीण जाते. गुरू गोविंदसिंगजी यांनी गुरू परंपरा संपवून गुरू ग्रंथ साहिबला गुरूचा दर्जा दिलेल्या ऐतिहासिक घटनेच्या 300 वर्षांच्या निमित्ताने आयोजित गुरूता गद्दी कार्यक्रमामुळे राज्य व केंद्र सरकारकडून निधी मिळाला आणि काही विकासकामे झाली. त्यात विमानतळ हे महत्त्वाचे काम मानले जाते. पण त्याच काळात झालेले रस्ते आणि ड्रेनेज अवघ्या काही वर्षांतच निकामी झाले. सध्या अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. पण चित्र असे की, कालच केलेला रस्ता आज पुन्हा खोदला जातो आणि त्याच ठिकाणी पुन्हा काम केले जाते. परिणामी, शासकीय निधीचा अपव्यय तर होतोच; पण शहरातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नांदेडकर हा त्रास सहन करत आहेत. म्हणूनच कैलास खेर यांनी व्यक्त केलेली भावना ही केवळ एका गायकाची प्रतिक्रिया नसून ती अनेक नांदेडकरांच्या मनातील खंत आहे. फरक एवढाच की, नांदेडकर रोज या खड्‌ड्यांतून मार्ग काढतात, तर कैलास खेर यांनी त्या खड्‌ड्यांचा आवाज देशभर पोहोचवला.

कधी कधी एखादा कलाकार सूर लावतो आणि त्या सुरातून सत्यही बाहेर पडते. नांदेडच्या रस्त्यांची अवस्था पाहता असे म्हणावेसे वाटते की, संगीताचा कार्यक्रम संपला असला तरी शहरातील विकासाचा सूर अजून लागायचा बाकी आहे. सुफी गायक कैलास खेर यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील रस्ते व वाहतुकी संदर्भात  वक्तव्य करुन प्रशासनाचे वाभाडे काढले आहे. रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या जवळचे आहेत. आपल्या जवळच्या व टक्केवारी देणार्‍या कंत्राटदाराला काम मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव असतो. परंतु आपल्या मतदारसंघात कशाप्रकारे रस्ते होत आहेत. तसेच रस्त्यांचा दर्जा कसा आहे याची पाहणी सुध्दा लोकप्रतिनिधी कधीही करीत नाहीत. कैलास खेर यांनी केलेले वक्तव्य हे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. 

- दृष्टीक्षेप

प्रदीप नागापूरकर



إرسال تعليق

0 تعليقات

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]