नागरिकांनो संयम बाळगा!अजून युद्ध संपलेले नाही

नागरिकांनो संयम बाळगा!अजून युद्ध संपलेले नाही
साधारणतः 19 मार्च पासून महाराष्ट्रात सर्व प्रथम आणि त्यानंतर देशात व देश पातळीवर कोरोना सारख्या अदृष्य शत्रू सोबत लढण्यासाठी काही उपाययोजना सुरु झाल्या. महाराष्ट्रात खास करुन दुबईहून भारतात म्हणजे मुंबईत परतलेल्या एक विमान प्रवाश्याला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट होताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकार कामाला लागले. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी आदेश लागू करुन राजकीय कार्यक्रम, धार्मिक उत्सवच नाही तर लग्न कार्य देखील पुढील आदेशा पर्यंत रद्द केले. हे करीत असतांना एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री राज्यात कोरोना रोगाचा फैलाव होवू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांचे आदेश काढत होते तर दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोनाग्रस्थांवर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात व्यस्थ होते. त्याचसोबत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याच्याही सुचनाही पोटतिडकीने देत होते. हे सर्व सुरु असतांनाच मुंबई, पुण्यात व राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होती. ‘निझामुद्दीन’ प्रकरण महाराष्ट्र पोलिस व आरोग्य विभागामुळे संपुर्ण देशासमोर आले. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण राज्यातील कोरोनाग्रस्तांचे मुळ रुग्ण हे परदेशातून आलेले किंवा दिल्लीतील तबलीकीच्या कार्यक्रमातून परतलेले व त्यांच्या संपर्कात आलेले आढळल्याने चिंता व्यक्त केली गेली. म्हणजे दुबई, इंग्लंड, चिन, फ्रान्स आदी परदेशातून परतलेले नागरिक आणि दिल्लीतील निझामुद्दीन येथुन परतलेल्या नागरिकांमध्ये किंवा त्यंाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये सुरुवातीला कोरोना आजाराची लक्षणे आढळून आली. हे सगळे चालू असल्याच्या दरम्यानच देशाचे केंद्र सरकार सतत महाराष्ट्राच्या संपर्कात होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आजाराचे गांभिर्य ओळखून एका दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ पुकारला. ‘फिजीकल डिस्टंस’ ‘सोशल डिस्टंस’ चे महत्वही सांगितले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाने देशात एक दिवसाचा जनता कर्फ्यू अभुतपूर्व यशस्वी झाला. त्याच सोबत भारतीय नागरिकांनी या युध्दात लढणार्‍या महसूल, आरोग्य, पोलिस विभागातील सैनिकांच्या सन्मानासाठी टाळ्या-थाळ्याही वाजवल्या परंतु पंतप्रधानाच्या आवाहनातील शब्दांमधील अर्थाचा अनर्थ काढीत जणू कोरोनाला हरवले, लोळविले असल्यागत ढोल-ताशे वाजवित राष्ट्रध्वज घेवून मिरवणुका काढल्या असे झाले असले तरी राज्यातील बहुसंख्य लोकांनी शासनाच्या सुचनांचे पालन केले. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज जी कोरोना बाधीतांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामध्ये असलेल्या निरनिराळ्या कारणात महत्वाचे दोषी म्हणजे शासन व प्रशासनाच्या सुचना न पाळणारे महाभाग त्यांच्या बेपर्वाहीची शिक्षा आज निष्पाप लोकांना भोगावी लागत आहे. लोकांनी शतप्रतिशत लॉकडाऊन पाळला असता तर आज लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र किंवा राज्य सरकारांना घेण्याची गरज भासली नसती. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देश पातळीवर सुरुवातीला एक दिवसाचा लॉकडाऊन व आता वाढलेला म्हणजे 18 दिवसांचा लॉकडाऊन शासन हे काही हौस म्हणून करत नाही. याचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवर पडत आहेत. हातावर पोट असणार्‍या करोडो श्रमिकांना पुन्हा रोजगार कसा उपलब्ध करुन घ्यायचा, सतत नफा आणि तोटा याचा विचार करणार्‍या भांडवलदारांच झालेलं नुकसान कसे भरुन काढायचे? अशा किती तरी प्रकारच्या समस्यांचा येणार्‍या काळात शासन यंत्रणेला सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो ही परिस्थिती अभुतपूर्व आहे. असा प्रसंग जगावर आपल्या देशावर पहिल्यांदाच आलेला आहे. शासन मग ते केंद्रातील मोदी असो की राज्यातील ठाकरे सरकार आपल्या जीवताचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करीत आहे. त्यामुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागत आहे. हे उघड सत्य आहे ते कोणी नाकारुही शकणार नाही. मात्र हे सगळं आपल्यासाठीच आहे हेही विसरुन चालणार नाही. काल म्हणजे सोमवारी मुंबईतील वांद्रयात परप्रांतातील कामगार आपापल्या घरी जाण्यासाठी केलेली गर्दी असो की आपल्या नांदेडमध्ये एकही रुग्ण नाही म्हणून बिनधास्त घराबाहेर पडणार्‍यांनो संयम बाळगा! अजून कोरोना सोबतचे युद्ध संपलेले नाही. चिनमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गाफील राहणे आपल्या व आपल्या सोबतच्या लोकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळेच खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
- प्रदीप नागापूरकर,नांदेड .

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]