प्रशासनाच्या सुचनांचे कटाक्षाने पालन करा,करोना टाळा
देशच नव्हे तर संपुर्ण जग कोव्हीड-19 (कोरोना) च्या वाढत्या प्रादुर्भावाने हैराण आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांनी आपआपल्या देशात लॉकडाउन केलेले आहे. भारतात ही दि.22 पासून देशव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली. त्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सार्वजनिक कार्यक्रम अगदी लग्न सोहळे, राजकीय सभा धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालून जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. कारण सर्वात प्रथम भारतात कोरोनाचे रुग्ण आढळले ते मुंबईत ही संख्या वाढू नये म्हणून राज्य सरकारने अत्यंत जलद गतीने उपाययोजना सुरु केल्या. आज या लॉकडाऊनला 15 दिवस उलटले असून 14 एप्रिलला 6 दिवस शिल्लक आहेत. 6 दिवसानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार परिस्थिती पाहून लॉकडाउन वाढवायचा की घटवायचा या बद्दल निश्चित अशी घोषणा करेलच.
देश, राज्य पातळीवर बर्याच ठिकाणी या लॉकडाऊनला नागरिक, सामाजिक, राजकीय संघटना, संस्थांकडून बर्याच मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण बर्याच चांगल्या प्रमाणात या साथ रोगाचा फैलाव आपण रोखलेला आहे. अमेरिका, चिन, इटली सारख्या प्रगत राष्ट्रांनी लॉकडाऊनला उशीर केल्याने या देशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या रोगांची लागण झालेल्यांची संख्या दररोज हजारोने तेथे वाढत तर आहेच शिवाय या रोगाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत ही दररोज हजारोंनी वाढ होत आहे. भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने तातडीने कडक उपाययोजना केल्याने आपल्याकडे वाढत असलेली संख्या चिंताजनक असली तरी नियंत्रणात आहे. या आजारातून योग्य उपचार घेवून परत जाणार्यांची संख्या ही शासनाचे व लोकांचे मनोबल वाढवणारी आहे. असे असले तरी शासन व प्रशासनाच्या खुप मर्यादा आहेत. एकीकडे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील उपस्थितांची संख्या 5% वर आणली आहे. दुसरीकडे आहे त्या कर्मचारी संख्येवर लोकांना जीवनावश्यक सुविधा पोहचविण्याचे कार्य करवुन घ्यायचे आहे. महसुल, पोलिस, बँक कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता विभागातील कर्मचारी, अक्षरशः स्वतः चा व कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून राबत आहेत. पोलिस अधिकारी, कर्मचारी दिवस, दिवस, उन्ह, वारा, पाऊस, वादळाची तमा न बाळगता रस्त्यावर उभे आहेत. असे सर्व असतांना काही मंडळी मात्र विनाकारण रस्त्यावर येवून गर्दी वाढवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.
जगाचा देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीचा आपण वर धावता आढावा घेतला. आता आपल्या नांदेडकडे बघीतले तर जिल्हाधिकारी मा.विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.विजयकुमार मगर, मनपाचे कर्मचारी खास करुन स्वच्छता विभागातील स्वच्छता निरिक्षकापासून ते कंत्राटी सफाई कामगार, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सरकारी व खाजगी डॉक्टर्स त्यांचा स्टॉफ, औषध विक्रेते, जीवनावश्यक वस्तुंचे विक्रेते आदी सर्वच जणु जनसेवेत स्वतःला झोकुन आहेत. त्या शिवाय गोरगरीबांना जेवन, मोफत अन्न धान्याचे कीट वाटपासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गोरगरीबांच्या वस्तीत जावून वाटप स्वतःच्या व त्यांच्या कुटुंबियांची पर्वा न करता काम करीत आहेत बरे हे सर्व पुरेसे आहे का तर निश्चितच नाही. कारण गरिब व गरजवंतांच्या गरजा अमर्याद आहेत. आजच्या अवघड परिस्थितीत सर्वांच्या गरजा पूर्ण करणे शासन काय देवालाही अवघड आहे. नांदेडमधील बहुसंख्य नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले म्हणूनच आज आपण सुरक्षित आहोत. आज नांदेड मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही म्हणून आपली जवाबदारी संपली असे नाही. हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे 5 तारखेला पंतप्रधानांच्या अंधार करुन दिवे लावण्याच्या राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार्या आवाहनानंतर अनेकांना कोरोना विषाणू संपला पळाला असा जणू समज झाला की काय 6 आणि 7 तारखेला नांदेडच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नांदेडकर मित्रांनो जरा धिर धरा, संयम बाळगा संकट अजुन नष्ट झालेले नाही. मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. आपल्याच शेजारच्या लातुर जिल्ह्यात सर्व काही सेम असतांना बाहेरगावाहून आलेले 8 रुग्ण अचानक सापडले. नांदेडमध्येही लॉकडाउन पूर्वी म्हणजे 19 मार्च पर्यंत व नंतरही मुंबई, पुणे अगदी काल गुन्हे दाखल झालेले इंडोनेशिया, दिल्लीतील मिळून 12 जण अचानक आढळून आलेले आहेत. याचा अर्थ अजुन बरेच जण लपून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आजार एवढा महाभयंकर आहे की एका पासून 406 जणांना याची लागण होऊ शकते. त्यामुळे घाबरुन जाण्याची ही वेळ नाही परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचमुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळा तरच लॉकडाउन पुर्णपणे उठवता येणे सरकारला शक्य होईल. कोरोनाला हरवायचे असेल तर शासन-प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
-प्रदीप नागापूरकर,नांदेड.
0 टिप्पण्या