नांदेडकरांनो घाबरु नका,काळजी घ्या! अफवांवर विश्वास ठेवू नका,व त्या पसरवू नका

नांदेडकरांनो घाबरु नका,काळजी घ्या!
अफवांवर विश्वास ठेवू नका,व त्या पसरवू नका 
नांदेड जिल्हा गेल्या एक महिन्यापासून कोरोनाबाधीतांच्या संख्येत शून्यावर होता. बुधवारची सकाळ नांदेडकरांसाठी धक्कादायक तर नक्कीच निघाली. त्यासोबत काळजी घेण्याची संकेत देणारी निघाली. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदा मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने खबरदारीचे उपाय म्हणून जमावबंदी, संचारबंदी व त्यानंतर केंद्र सरकारने जनता कर्फ्यू व लगेचच देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. साधारणतः एक महिन्यापासून देशभरातील विविध शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सारख्या शहरात कोरोनाच्या फैलावाने आणखीनच चिंता वाढवली. या सगळ्या परिस्थितीत नांदेड शहर व जिल्हा अगदी सुरुवातीपासून सुरक्षित समजला जात होता. मात्र अचानक बुधवारी सकाळी एका 64 वर्षीय वृध्द व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने नांदेडकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु या जीवघेण्या आजाराशी लढतांना भिऊन चालणार नाही. जगभरात या आजाराची उपचार पध्दती अजुन पूर्णपणे विकसीत झालेली नाही. असे असले तरी या आजारातून बरे होणार्‍यांची संख्याही महाराष्ट्रात तरी कमी नाही. महाराष्ट्रात या आजारामुळे मृत्यूचा दर तसा पाहिला तर कमी आहे. म्हणून काळजी न घेणे हा मोठा धोका ठरु शकतो. नांदेडमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आहे. त्यातुन मोठ्या प्रमाणात अफवाही पसरविल्या जात असल्याचे निर्दशनास येत आहे. गेला महिनाभर नांदेड मधील 80% नागरिकांनी कमालीचा संयम दाखविला आहे. ज्या 80% लोकांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले. प्रशासनातील महसूल, आरोग्य, पोलीस, मनपातील सफाई कामगार, आशा वर्कर्स आदी कर्मचार्‍यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नांदेडकरांना सतर्क करण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यामुळेच आपण नांदेडकर इतके दिवस सुरक्षित राहिलोत. आज पहिला रुग्ण पॉझीटीव्ह सापडला आहे. त्याच्या प्रवासाचा इतिहास अजुन उघडकीस आला नाही. तो कुठून कसा आला, दिल्ली, मुंबई, पुणे, मरकज आदींचा त्याचा काही संबंध आहे का? या गोष्टी येणार्‍या काळात स्पष्ट होतीलच. वर म्हटल्या प्रमाणे 80% नांदेडकरांनी प्रशासकीय सुचनांचे पालन केले. परंतु 20% लोक निष्काळजीपणे रस्त्यावर होतेच. त्यांच्या कोणाच्या हा रुग्ण संपर्कात आला आहे का? या बाबी प्रशासनाला शोधुन काढाव्या लागतील. व त्या योग्य वेळी बाहेरही येतील. परंतु नांदेडकरांसाठी आता मात्र धोक्याची घंटा वाजलेली आहे. वास्तविक आज सकाळीच हे वृत्त वृत्तवाहिण्यांवर प्रसारीत झाले. तरीही दुपारच्यावेळेला विनाकारण फिरणार्‍यांची मोठी संख्या रस्त्यावर दिसत होती. एका दृष्टीने हा नांदेडकरांचा बेजबाबदारपणा आहे. त्याचसोबत सोशल मिडीयावर काही अफवाही पसरविल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस व संपुर्ण जिल्हा प्रशासन गेल्या महिन्याभरापासून स्वतःच्या जीवाची काळजी न करता सर्व प्रशासकीय नियम पाळत अत्यंत अल्पअशा कर्मचारी संख्येत नांदेडकरांची आवश्यक ती काळजी घेत आहेत. अशावेळी नांदेडकरांनीही या जांबाज अधिकारी व कर्मचार्‍यांना पूर्णपणाने सहकार्य करण्याची गरज आहे. नांदेड जिल्हा अगोदरच संवेदनशिल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नांदेडकरांनी आता घाबरुन न जाता काळजी घेण्यासोबतच अफवा पसरवु न देणे व त्यावर विश्वास न ठेवणे ही एक मोठी जबाबदारी नांदेडकरांवर येवून ठेपली आहे. प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या सुचनांचे पालन केले तर निश्चितच आपण कोरोनावर मात करु शकतो हे मागील महिन्याभरात आपण दाखवून दिलेले आहे. त्यामुळे चला आता निर्धार करा. कोरोनाला टाळण्यासाठी प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करा. शेजारी-पाजारी बाहेरगावाहून विनापरवानगी कोणी आले असेल तर त्याची सुचना प्रशासनास तात्काळ देण्याची जबाबदारीही नांदेडकरांचीच आहे. याचाही विसर पडायला नको. कारण अनेक ठिकाणी प्रशासनाचा कडक पहारा चुकवून लोक बाहेर गावाहून नांदेडात दाखल झाल्याचे लोक खाजगीत सांगत आहेत. असे न करता नक्की तसे असेल तर कुठल्याही प्रकारची भिडभाड न बाळगता त्या संदर्भात प्रशासनाला कळवणे गरजेचे आहे. 

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]