Header Ads Widget

‘कोरोना’लढाईतील पोलीस प्रशासनाला नांदेडकरांनी साथ द्यावी!

‘कोरोना’लढाईतील पोलीस प्रशासनाला नांदेडकरांनी साथ द्यावी!

नांदेडकर मित्रानों आपण गुरुवारच्या अंकात आपण आपल्याला (म्हणजे तुम्हाला आम्हाला) कोरोना विषाणुंची लागन होवू नये आपल्या अहोरात्र झटणार्‍या प्रशासनातील महत्वपूर्ण अशा महसूल विभागाच्या लॉकडाऊन काळातील कार्याचा धावता आढावा घेतला. अधीच कमी कर्मचारी संख्येत प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी स्वतः च्या कुटुंबियांची काळजी न करता स्वतःला कोरोना विरुध्दच्या या लढाईत एखाद्या योध्या प्रमाणे लढत आहोत. बरं त्यांचा हा आटापिटा कशासाठी तर तुम्ही तुमच्या घरी सुखरुप रहावे यासाठी ते रात्रंदिवस एक करुन झटत आहेत. कोणी ऑफीसमध्ये बसून कोणी रस्त्याने फिरुन तर कोणी ‘वर्क फॉम होम’ करीत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेण्याचा व त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा छोट्यासा प्रयत्न आहे. देशव्यापी ‘लॉकडाऊन’ असल्याने जीवनावश्यक वस्तु तुमच्या दारापर्यंत पोहचाव्यात म्हणून प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मात्र काही बोटावर मोजण्या इतके लोक प्रशासनाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद न देता विनाकामाचे रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. त्यांच्या या कृतीने समस्त नांदेडकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. कारण या विषाणुचा संसर्ग झाल्याबरोबर त्याची लक्षणे झटपट जाणवत नाहीत. बरे जाणवली तरी ती लक्षणे मानसाला फार गंभीर वाटत नाहीत. सर्दी, ताप, खोकला हा नियमीत आजाराचा भाग असल्याने आपण त्याला गांभिर्याने घेत नाहीत. वेळेवर तपासण्या करीत नाहीत. आणि ही लक्षणे कोरोनाचीच असली तर आपल्या सोबत आपण दोन, चारशे लोकांना या आजाराचा ‘प्रसाद’ देवून बसलेले असतोत. राज्यात बहुतांश जिल्ह्यात कोरोनाची लागन झालेले रुग्ण आढळले आहेत. अगदी आपल्या नांदेड जिल्ह्यापासून 30-35 कि.मी. असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आढळलेले रुग्ण नांदेड मार्गेच वसमतला गेलेले आहेत. लातूर मार्गेच वसमतला गेलेले आहेत. लातूर जिल्ह्यात 8 रुग्ण आढळले. तेलंगणात आढळले. असे असतांनाही नांदेड जिल्ह्यात मात्र आज तारखेला तरी कोरोनाचा एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. याचे सर्व श्रेय जसे शासन व प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करणार्‍यांना जाते तसे ते प्रशासनाचा महत्वपुर्ण भाग असलेल्या पोलिस विभागालाही जाते.
साधारणतः पोलिस म्हटले की सर्व सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होवून भिती वाटू लागते. वास्तविक पोलिस कायदा मानणार्‍या व कायद्यानुसार चालणार्‍यांचा मित्र असायला हवा परंतु समाजात पोलिस हे सर्व सामान्यांचे शत्रु व गुन्हेगार, गुंडाचे मित्र असे चित्र रंगविण्यात आलेले आहे. पण ते पुर्ण सत्य नाही. आज आपण अदृष्य अशा शत्रुशी लढत आहोत. आपल्याला आपली जेवढी काळजी वाटत असेल तेवढीच पोलिसांनाही त्यांच्या स्वतःची व आपल्या कुटुंबियांचीही काळजी वाटत असेलच ना? तरीही ते रस्त्यावर बिनकामाचे कोणी फिरु नये म्हणून दिवसरात्र रस्त्यावर उभे आहेत. ते काही केवळ तुम्हाला दंडूके मारण्यासाठी नाही तर तुम्हाला कोण्या कोरोना बाधीताशी संपर्क येवू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप आहे. हे समजवून घेण्याची गरज आहे. शासन किंवा विभागाच्या वतीने कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी फारशा उपाय योजना झालेल्या नसतानाही ते आपला जीव धोक्यात टाकुन आपल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवीताचे रक्षण करीत रस्त्यात उभे आहेत.
नांदेडचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.विजयकुमार मगर या काळात अत्यंत संवेदनशील अधिकारी म्हणून पुढे आले आहेत. जमावबंदी असो की रस्त्यावरची वाढती गर्दी त्यांनी वेळीच रोखली म्हणूनच तर आपल्याकडे मागच्या 16 दिवसात कोरोनाचा एकही बाधीत सापडू शकला नाही. त्यांच्या संवेदनशिलतेचा परिचय झाला तो त्यांनी कर्मचार्‍यांसह आरोग्य, सफाई कामगारांना हॅडवॉश साबण, मास्क आदी आवश्यक साहित्य वाटप केले. साधारणतः कोणत्याही विभागाचा वरिष्ठ अधिकारी आधी स्वतःचे नंतर आपल्या विभागाची काळजी घेतांना दिसतो. परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अगदी सफाई कामगार या काळात करत असलेल्या कार्याची महती, महत्व त्यांनी ओळखले व त्यांची काळजी घेतली. पोलिस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी निश्चितच काही ठिकाणी अनावश्यक बळाचा वापर करीत ही असतील परंतु त्यांच्या या कृत्याची दहशत बसून अनेकजण गप्प गुमाने घरात बसून आहेत. त्यामुळे कोरोना सारख्या अदृष्य जिवघेण्या शत्रु सोबत लढत असताना पोलिस विभागाचे योगदानही महत्वपूर्ण आहे.
-प्रदीप नागापूरकर,नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]