Header Ads Widget

कोरोनाच्या लढाईतील आरोग्य विभागाचे लढवय्ये

कोरोनाच्या लढाईतील आरोग्य विभागाचे लढवय्ये
गुरुवारी आपण आरोग्य कोरोना विरुध्दच्या लढाईतील प्रशासनातील महसूल विभाग तर शुक्रवारी कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या पोलीस प्रशासनातील योध्दांच्या कार्याची महती जाणून घेतली. आज आपण या युध्दातील प्रमुख विभाग असलेल्या आरोग्य विभागाचे महत्व जाणुन घेणार आहोत. शासकीय असो की, मनपाचा आरोग्य विभाग म्हटले की, सामान्य माणसाच्या कपाळावर आठ्या-काठ्या उमटतात. शासकीय रुग्णालय म्हटले की, ज्यांनी कोणी एखादे वेळेस तेथे भेट दिलेली असेल त्याच्या समोर निट न बोलणारा डॉक्टर, चिड-चिड करणार्‍या नर्सेस, अंगावर धावून येणारा तेथील स्टॉफ असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु आजही गोर-गरीब, निर्धन रुग्णांसाठी हीच रुग्णालये जीवनदायी आहेत. याचा आपल्याला सोईस्कररित्या विसर पडतो. बर्‍याच वेळेला शासना मार्फत शासकीय रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. जसे की, तपासण्यांसाठी आवश्यक असणारी महागडी उपकरणे औषधी यांचा वापर गोर-गरीब रुग्णांसाठी होतही असतो परंतु शासन नंतर त्या यंत्र सामुग्रीच्या देखभाल, मेनटनन्सकडे दुर्लक्ष करते व त्यातुन ही यंत्र सामुग्री अक्षरशः किरकोळ दुरुस्ती अभावी बंद पडते, धुळखात पडते. याचे खापर आपण शासकीय रुग्णालयातील अधिकारी म्हणजे डॉक्टर कर्मचार्‍यांवर सहजरित्या फोडून मोकळे होतोत. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन वारंवार बंद असल्याच्या तक्रारी येत असतात. गोर-गरीब व सामान्य रुग्णांना विनाकारण खाजगी तपासणी केंद्रावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. व त्याचे परिणाम म्हणजे शिव्या. मात्र सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना सहन कराव्या लागतात. कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य सेवेच्या राष्ट्रीकरणाचे महत्व आता समोर येवू लागले आहे. पुर्वी आरोग्य विभागासाठी आर्थिक तरतुद करतांना सर्वच जण हात अखडता घेत असत. आज हीच शासकीय आरोग्य सेवा कोरोनाच्या लढाईत आघाडीवर आहे. पी.पी.किट, निर्जंतुकीकरण उपकरणे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचार्‍यांच्या वैयक्तीक सुरक्षा उपकरणांचा प्रचंड प्रमाणात देशभरात तुटवडा जाणवत आहे. व्हेंटीलेटरचा प्रचंड तुटवडा असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. असे असतांनाही शासकीय आरोग्य सेवेतील अधिकारी म्हणजे डॉक्टर असोत की नर्सेस स्वतःच्या सुरक्षेची तमा न बाळगता कोरोनाला हरविण्यासाठी पहिल्या रांगेत बलदंड योध्दा म्हणून उभे आहेत. त्यांच्या कार्याला आमचा सलाम!
-प्रदीप नागापूरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]