जातीव्यवस्था निर्मुलन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

जातीव्यवस्था निर्मुलन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जाती निर्मूलनासंबधीचे मुलभूत पुस्तक 1936 मध्ये ‘अनहिलेशन ऑफ कॉस्ट’ हे प्रकाशित झाले. हे पुस्तक म्हणजे 1936 साली लाहोर येथील जात पात तोडक मंडळाच्या न झालेल्या वार्षीक परिषदेचे अध्यक्षीय भाषण होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे एक महत्वपूर्ण भाषण राहिले आहे.
भारतातील जाति व्यवस्था हे समाज जीवनाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. भारतातील जाती व्यवस्थेला पावित्र्याची जोड मिळाली आहे. एकदा जर पावित्र्य लाभले तर तिच्यात बदल होणे शक्य वाटत नाही. जन्मतः जात ही चिटकत असल्यामुळे त्यात बदल होणे शक्य नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची महान विद्ववता असूनही या भारताने त्यांची विद्ववता स्वीकारली नव्हती. जोपर्यंत जगाच्या क्षितिजावर तळपल्याशिवाय त्यांची दखलच घ्यावयाची नाही असे जणू भारतातील लोकांनी ठरवुन टाकले होते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून पाहता येईल.
एका देशाला दुसर्‍या देशावर हुकूमत गाजविण्याचा जसा अधिकार नाही हे तत्वज्ञ मिलच्या तत्वानुसारच एका समुदायाला दुसर्‍या समुदायावर हुकूमत गाजविण्याचा अधिकार नाही हे मान्यच करावे लागेल. जात एक असा महाकाय राक्षस आहे की, तो तुमच्या मार्गात आडवा येणारच. या राक्षसाचा खातमा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा करता येऊ शकणार नाही तसेच आर्थिक सुधारणा करता येणार नाही.
जातीव्यवस्था हे केवळ श्रम विभाजनाचे दुसरे नाव आहे आणि श्रम विभाजन हे प्रत्येक प्रगत समाजाचे वैशिष्ट्य आहे, असे मत मांडणार्‍याला उत्तर म्हणून जातीव्यवस्था हे फक्त श्रम विभाजन करीत नाही तर श्रमीकांचेही विभाजन करते. तसेच एकाच्या डोक्यावर दुसरी अशी श्रमिकांची वर्गवारी केलेली ती श्रेणीबद्ध उतरंड आहे. भारतातील श्रमविभाजन उत्स्फुर्त नाही ते नैसर्गिक आवडीवर आधारलेले नाही. जाती व्यवस्थेने लोकांचे व्यवसाय आधीच ठरवून या तत्वाचे उल्लंघन केले आहे. व्यवसायाची निवड व्यक्तीच्या मुळ क्षमतेला प्रशिक्षण देवून नव्हे तर त्यांच्या वाडवडीलांच्या सामाजिक दर्जावरुन केलेली आहे. जातिव्यवस्था हिंदूंना त्या व्यवसायाशी त्यांचा वंशपरंपरेने संबध नसेल तर तिथे त्यांची आवश्यकता असली तरी तो निवडण्याची परवानगी देत नाही. एखादा हिंदू त्यांच्या जातीला नेमून न दिलेले नवे व्यवसाय करण्या ऐवजी उपासमार सहन करतांना दिसला तर त्याचे कारण जाति व्यवस्थेमध्ये आढळून येते. काळानुरुप व्यवसायात बदलाची परवानगी देशात आपल्याला दिसणार्‍या बर्‍याचशा बेरोजगारीला जातिव्यवस्थेचे मानगुटीवरचे भुत मजबूत करते.
ज्या व्यवस्थेत माणसाचे मन व बुद्धी त्यांच्या कामात वापरली जात नाही त्या व्यवस्थेत कार्यक्षमता राहत नाही. मग औद्योगिकीकरणाच्या पध्दतीमध्ये गरीबी किंवा कष्ट नसून त्यात जातीव्यवस्थेच्या बळीचा व्यवसाय पसंत नसतांना करावा लागणे हे देखील आहे.
हिंदूना जात मोडायची असेल तर त्यांचा धर्म त्यांच्या मार्गात आडवा येतो. प्रचलित समाज रचना बदलल्या शिवाय प्रगती होत नाही. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारु शकत नाही. तुम्ही राष्ट्र उभारु शकत नाही, तुम्ही नैतिकता उभारु शकत नाही, जातीच्या पायावर तुम्ही कितीही मजले भक्कम इमारती उभारल्या तरी त्याला तडेच जातील आणि ते एकजीव असणार नाही. हिंदू समाज व्यवस्थेतील सुधारणा कशा घडवून आणायच्या. जात कशी नष्ट करायची यावरचा उपाय आंतरजातीय विवाह तसेच आंतर स्नेहभोजन हे अल्पशा स्वरुपात असणारे उपाय आहेत. जातीचा धर्म शिकविणारे धर्मशास्त्रे आहेत. धर्मशास्त्राच्या पावित्र्यावरचा विश्वास ध्वस्त करणे हा त्यावरचा खरा उपाय आहे.
धर्माला नवीन तत्वांचा आधार दिलाच पाहिजे. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांच्याशी, म्हणजेच लोकशाहीशी अनुरुप असला पाहिजे. संपुर्ण पुनर्रचना केल्याशिवाय बर्‍यापैकी घासून तासून त्यात असलेला अशुध्द धातु काढल्याशिवाय परिवर्तन होवू शकत नाही. जातीची व्यवस्था ज्यामुळे बळकट आहे. त्याला आदर्श पुरविणारा स्त्रोत म्हणून भुतकाळाचे पुजन करणे थांबविले पाहिजे. कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, कुठलीही गोष्ट सनातन नाही. प्रत्येक गोष्ट बदलत असते. व्यक्ती तसेच समाजासाठीही बदल हाच जीवनाचा नियम आहे. बदलत्या समाजात, जुन्या मुल्यात सतत क्रांती घडविली पाहिजे. तसेच माणसाच्या कृतीचे मुल्यमापन करण्यासाठी काही मानक असले पाहिजे. तसेच त्या मानकामध्ये बदल करण्याची तयारी सुध्दा असली पाहिजे.
जात मुळापासून उखडून टाकण्याचे प्रयत्न केलेच पाहिजेत, जातीयता नष्ट करण्यासाठी बरेचसे प्रयत्न बाबासाहेबांकडून शेवटपर्यंत  झाले. त्यांनी चातुर्वण्य पध्दतीचे समर्थन करणार्‍यांना देखील सडेतोड उत्तरे दिलेली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोर येथील न झालेल्या जात पात तोडक या अधिवेशनात खंत व्यक्त करतांना असे म्हटले होते की, हिंदू म्हणून माझे शेवटचे मनोगत असेल. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्मातील सर्व बदलाची शक्यता वाटत नसल्यामुळे 1956 ला नागपूर येथे असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.
प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे
सायन्स कॉलेज,नांदेड.

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]