मानव मुक्तीच्या लढ्याचे नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मानव मुक्तीच्या लढ्याचे नायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जन्मतः मनुष्य, प्राणी मात्रात निसर्गाने प्रजननाच्या दृष्टीने स्त्री-पुरूष असा लिंगभेद केला असला तरी हा भेद मानवी प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक मानला जातो. पृथ्वीतलावर विविध बेटांवर मानवी वस्त्या वसल्या असून, मनुष्य आदिम काळापासून समूहाने राहत आला आहे. साधारणतः 5000 वर्षापूर्वी रामायण आणि 4500 वर्षापूर्वी महाभारत या काल्पनिक कथांची रचना करण्यात आली असा दावा केला जातो. रामायणात सर्वप्रथम सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भेदभाव केला आहे. जेंव्हा रामाची पत्नी सीता हिचे अपहरण रावण करतो त्यावेळी रामाच्या आदेशानुसार रावणाची बहीण सुर्पनिका हिचे नाक लक्ष्मण निर्दयीपणे कापून टाकतो. कथेतील नायक राम हा लोकांच्या सांगण्यावरून सीतेची अग्निपरीक्षा घेतो. अग्निपरीक्षा घेऊन देखील राम सीतेच्या चरित्र्यावर संशय घेऊन गर्भवती सीतेला जंगलात नेऊन सोडतो दोन्ही प्रसंगात स्त्रीचा घोर अपमान करून स्त्रीवर अमानवी अत्याचार करण्यात आला आहे. महाभारतात पाच पांडव एका स्त्रीशी (द्रौपदी) अमानवीयपणे विवाह करतात. कौरव व पांडव यांच्यातील जुगाराच्या डावात द्रौपदीला डावावर लावले जावून जेव्हा जुगाराच्या डावात पांडवांची हार होते तेंव्हा दुर्योधन द्रौपदीचे वस्त्रहरण करतो. महाभारतात देखील स्त्रीचा घोर अपमान करण्यात आला आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी समतेचा सम्यक मार्ग सांगितलेला असताना देखील 1000 वर्षांपूर्वी मनुस्मृती लिहून माणसा माणसात ब्राह्मण, क्षेत्रीय, वैश्य, शूद्र असा जाणीवपूर्वक भेदभाव करण्यात आला. वर्ण व्यवस्थेत सर्वश्रेष्ठ ब्राह्मानांना समजण्यात आले असून सर्वात कनिष्ठ शुद्रांना समजण्यात आले आहे. वर्ण व्यस्थेत सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असून देखील ब्राह्मण स्त्री मात्र शूद्र समजण्यात आली आहे. शुद्रांना माणूस म्हणून जगण्याचे मानवी अधिकार स्पष्टपणे नाकारण्यात आले होते. मनुस्मृतीचा आधार घेऊन भारतातील सनातनी हिंदू धर्मातल्या धर्म ठेकेदारांनी शुद्रांना मंदिर प्रवेश आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला. सनातनी हिंदू धर्माची वैज्ञानिक चिकित्सा करून प्रतिगामी धर्मव्यस्थेवर तथागत गौतम बुद्ध, विद्रोही संत कबीर,महात्मा बसवेश्वर, कार्ल मार्क्स, क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सवित्रीआई  फुले, क्रांतिगुरु लहुजी साळवे, बालसुधारक मुक्ता साळवे आदी महामानवानी सनातनी धर्मव्यवस्थेवर घणाघाती हल्ला केला. प्रज्ञासूर्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, कबीर, आणि ज्योतिराव फुले यांना गुरु मानून मी हिंदू मनुन जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा करून भारतातील मानव मुक्तीच्या लढ्याची सुरुवात केली होती. क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि सवित्रीआई फुले यांनी 1868 मध्ये स्वतः च्या घरातील विहीर शूद्रांसाठी खुली केली होती. तोच धागा पकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह आपल्या लाखो अनुयायांना घेऊन केले. ज्या मनुस्मृतीने शूद्र आणि शुद्र महिलांचे मूलभूत मानवी हक्क नाकारले त्या मनुस्मृतीचे 25 डिसेंबर 1927 रोजी लाखो समुदायाच्या साक्षीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केले. याच मनुस्मृतीने शुद्र आणि महिलांना मंदिर प्रवेश नाकारला होता. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हार न मानता आपल्या लाखो अनुयायांसह 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे भव्य काळाराम मंदिर प्रवेश केला. परंतु आज देखील दलित आणि महिलांना मंदिरात प्रवेश नाकारलेला आहे यातून हे स्पष्ट होते की सनातनी धर्मव्यस्था किती प्रतिगामी आहे. शूद्रांची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वांगीण प्रगती करावयाची असेल तर शुद्रांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे यासाठी डॉ.बाबासाहेब  आबेडकरांनी शूद्रांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. परंतु महात्मा गांधींनी मात्र याला प्रखर विरोध करत उपोषणाचे हत्यार वापरले. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला ज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना गांधीचे प्राण वाचविण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाएवजी राखीव जागावर समाधान मानावे लागले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी भारतीय राज्य घटना लिहण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. राज्य घटनेतील मूलभूत अधिकारात कलम 14 मध्ये समानतेचा अधिकार देऊन भारतातील कोणत्याही नागरिकाला धर्म, जात, पंथ, वंश, लिंग या आधारे भेदभाव करता येणार नाही. तरी परंतु संघ प्रणित प्रतिगामी भाजप सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 आणून राज्य घटनेच्या मूळ चौकटीला छेद दिला आहे. 11 एप्रिल 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून महिलांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी हिंदू कोड बिल आणण्यात आले. परंतू भारतातील प्रतिगामी लोकांनी तब्बल 4 वर्ष हिंदू कोड बिलाला विरोध केला. शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलासाठी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सनातनी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, प्रचंड त्याग केला. स्वतःचा आणि स्वतःच्या कुटूंबाच्या सुखाचा कधीच विचार केला नाही. सनातनी कर्मठ प्रतिगामी धर्माचे ठेकेदार सुधारणार नाहीत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्ष्यात आल्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह तथागत गौतम बुद्धांच्या विचारधारेचा स्वीकार करून सनातनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे मानव मुक्तीच्या लढ्यात गेले म्हणून त्यांना भारतातील मानव मुक्तिच्या लढ्याचे नायक होते असेच मनावे लागेल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-कॉ.प्रा.सदाशिव भुयारे
राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी,
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड)

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]