आम्ही नांदेडकर खरोखरच भाग्यवान
खरोखरीच आम्ही नांदेडकर भाग्यवानच आहोत. मी नशीबवान हा शब्द प्रयोग करत नाही .आज काल उठ सुट बरे वाईट झाले की नशिबाला दोष देतात. बहुसंख्य भारतीय प्रयत्नवादी न राहता प्रत्येक गोष्टीत नशिबाला दोष देऊनच जगत असतात.अशा स्वभावामुळे निराशाच पदरी पडून. मानवाची मानसिकता क्षीण होत असते.मानवाला बहुसंख्य गोष्टी निसर्गानेच प्रदान केलेल्या असल्यामुळे प्रयत्नवादी व प्रामाणिकपणे मिळालेल्या संधीचे सोने करूनच काही मानव जगत असतात.तसे निसर्ग निर्मित व प्रयत्नांच्या जोरावर उभा राहणार्या मानवाला आपण भाग्यवान समजतो.जो मानव या दोन गोष्टीचा प्रामाणिकपणे विचार न करता राहतात त्याला नशीबवान संबोधले जाते असे सर्वश्रुत आहे.
इतरत्र ठिकाणाच्या तुलनेत निसर्गाने आपल्या नांदेड जिल्ह्याला एवढे भरभरून दिले आहे की त्यामुळे आपल्या समग्र नांदेड जिल्ह्याची नोंद व ओळख जगाच्या नकाशावर स्पष्टपणे आपणा सर्वानाचं नव्हे तर संपूर्ण जगालाही दिसते. त्याची अनेक प्रमुख कारणे आहेत पण काही विशेषत्वाने आपणा सर्वांना नेहेमीच जाणवतात व स्मरणात राहतात. अशा विशिष्ठ निसर्ग व मानवनिर्मित संपत्तीच्या सानिध्यात आपण नांदेडकर खरोखरच भाग्यवान आहोत. संपूर्ण जिल्ह्याला विस्तृत रूपाने मिळालेला गोदा काठ, गुरुगोविंदसिंगांच्या बलिदानाने पावन असलेला गुरुद्वारा, साडेतीन शक्ती पीठांपैकी सबंध भारतात प्रसिद्ध असलेली माहूरची रेणुकामाता, कंधार येथील पांचालपूर नगरीत प्रसिद्ध असलेला किल्ला, किनवट व माहूर परिसरातील घनदाट वनराई , होट्टलचे कला वैभव, राहेर चा नरसिंह ,आशिया खंडातील विष्णुपुरी धरण, कोंडलवाडी व धर्माबाद ची लाल मिरची अशी असंख्य निसर्ग व मानवनिर्मित संसाधने लाभलेली, तसेच सोबतच असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाने व बलिदानाने नटलेला आपला नांदेड जिल्हा आजही इतिहास व भूगोलाच्या पानावर उठून दिसतो याचा मला तर अभिमान व स्वाभिमान जरूर आहेच पण आम्हा समग्र नांदेड कारांनाही निश्चितच असणार व राहिलाच पाहिजे.
याचे मुख्य कारण कुठल्याही चांगल्या किंवा आपातकालीन परिस्थितीत याची आम्हास जाणीव होते. त्याचे असे की समग्र नांदेडकर असो किंवा महाराष्ट्रीयन असो आम्ही नांदेडकर सर्वांच्या मदतीसाठी अग्रेसर असतोच. मागच्या दहा दिवसांपासून संपूर्ण जगासोबत आम्ही नांदेडकरही कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगामुळे ग्रासित व भयभीत आहोत. पण याचे गांभीर्य ओळखून संपूर्ण मानवजातीच्या रक्षण व संरक्षणासाठी धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन जनसेवेत मग्न आहोत. त्यात प्रमुख्यणे आजही इतर सेवाभावी संस्थांप्रमाणे नांदेड च्या गुरुद्वाराचा सिंहाचा वाटा असून जनसामन्यासाठी अतिशय मोलाचा आहे. स्थानिक स्तरावरील गरीब व सर्वसामान्यांच्या पोटाचा विचार करून बाबाजींच्या छत्रछायेखाली घरोघरी जाऊन सेवाभावी वृत्तीने लंगर प्रसादाची अतिशय उत्तम व चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा कुठल्याही आपत्तिकालिन परिस्थिती मध्ये नांदेडच्या लंगरची भूमिका चोख व नेहेमीच अग्रेसर असते. म्हणून आपत्तीजनक परिस्थितीचे भय इतरांप्रमाणे आम्हा नांदेडकरांना कधी वाटत नाही. भक्कमपणे सर्वसामान्यांसोबत राहूनही मंडळी नेहेमीच कार्यरत असते. ही नशीबापेक्षा भाग्याचीच गोष्ट अधिक प्रमाणात आहे. ही सोई साधने नसती तर आमची काय वाट लागली असती हे विचार न केल्यास बरे होईल.
आमच्या नांदेकरांच्या अशा दानशूर व सेवाभावी वृत्तीमुळे खरोखरीच आम्ही सुखी व समाधानी आहोत. काही अपवादात्मक गोष्टींचा विचार न केलेला बरा. अनावधानाने कुणी बुद्धीहीन अपमानकारक बोलल्यास आमची तळपायाची आग मस्तकात जाते. ही सर्व निसर्ग व मानव निर्मित साधने भविष्याच्या हितासाठी व फायद्यासाठी अत्यंत उपयुक्त व गरजेचीच आहेत.या साठी हा सर्व इतिहास व भाग्यवान ठेवा भावी पिढीने मनोमन व कर्तव्य बुद्धीने अनुकरुण व आत्मसात करून वर्तमान व भविष्यासाठी सांभाळून उत्तरोत्तर वृद्धिंगत करून देशहित व नेहेमीच जनहित लक्षात घेऊन याचा वापर व्हावा हाच मानस आहे. म्हणूनच संस्कृत मधील सुभाषित आठवणीत आहे जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरियसी.
0 टिप्पण्या