Header Ads Widget

1)बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल,2) टिपू सुलतान चौक नामकरण करण्यास न.पा.ची टाळाटाळ,3)नापिकीला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या,

 



=========================================================

बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड/प्रतिनिधी-त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ दि.12 नोव्हेंबर रोजी देगलूर नाका भागात ध्वनीप्रेक्षकाद्वारे जमाव जमविल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जवळपास 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी दि.12 नोव्हेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन केले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन नांदेड जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश तसेच कोविड-19 नियमावली लागू  असतांना खुदबेनगर चौरस्ता येथे ध्वनीप्रेक्षकाद्वारे बेकायदेशिररित्या मोठा जमाव जमविण्यात आला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होवून जमावातील काही समाजकंटकांनी दुचाकी वाहन व पोलीसांवर दगडफेक केली. या दगडफेकीच्या घटनेत इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे व काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेनंतर नांदेड शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलीस जमादार दिलीप चक्रधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी फारुखभाई, बशीरभाई, तीन मौलाना व अन्य 25 ते 30 जण यांच्या  विरुध्द कलम 188, 269, 270 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार हंबर्डे हे करीत आहेत.

===========================================

टिपू सुलतान चौक नामकरण करण्यास न.पा.ची टाळाटाळ

देगलूर/प्रतिनिधी-देगलूर शहरातील गुजरी गल्ली चौकास टिपू सुलतान चौक नामकरण करण्याचा ठराव न.पा.च्या सर्वसाधारण सभेत दोन वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. परंतु सदरील चौकाचे नामकरण करण्यास न.पा.प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.  

गुजरी चौकास शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी ऑल इंडिया तन्जिम ए इन्साफ चे तालुकाध्यक्ष हबीब रहेमान यांनी एका निवेदनाद्वारे 19 नोव्हेंबर 2019 रोजी केली होती. 18 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या न.पा.च्या सर्वसाधारण सभेत टिपू सुलतान नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ठराव मंजूर होवून जवळपास दोन वर्ष झाले आहेत. परंतु सेक्युलर म्हणणार्‍या न.पा.मधील लोकप्रतिनिधींनी टिपू सुलतान चौक असे नामकरण करण्या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. येत्या दि.20 नोव्हेंबर रोजी शहीद टिपू सुलतान यांची जयंती आहे. त्यादिवशी न.पा.प्रशासनाने चौकाचे सुशोभिकरण करुन टिपू सुलतान चौक असे नामफलकाचे अनावरण करावे, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नामफलकाचे अनावरण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद मोहिय्योदीन, राष्ट्रवादी युवक शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान, पत्रकार इरशाद पटेल, पत्रकार अजीम अन्सारी यांचा प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

==============================================

नापिकीला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

नांदेड/प्रतिनिधी-नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या घटनेचे सत्र सुरुच आहे. कंधार तालुक्यातील भुत्याचीवाडी येथील शेतकरी किशन वामन भुते (वय 47) यांनी शेतातील सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून दि.6 नोव्हेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे त्यांना दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चंद्रकांत भुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उस्माननगर पोलीस ठाण्यात कलम 174 अन्वये अकस्मीक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या एका घटनेत निचपूर ता.किनवट येथील शेतकरी घनश्याम विश्वनाथ गुट्टे यांनी शेतातील सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. राजकुमार गुट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किनवट पोलीस ठाण्यात कलम 174 अन्वये अकस्मीक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस जमादार बोंडलेवाड हे करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]