हे पाप तर आम्हा मतदारांचच

 हे पाप तर आम्हा मतदारांचच

काल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. या ऐतिहासिक व धाडसी निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीसजी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!. राज्यातील होतकरू तरुणांना पापमुक्त केल्याबद्दल शासनाच्या या निर्णयाचे कौतुकच केले पाहिजे. याचे सारे श्रेय राज्यातील सत्ताधार्‍यांना जाते.

 पूर्वीच्या शासन निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरून राज्यातील लाखो तरुणांनी आंदोलन केले, कारण त्यांच्या हाताला काम नाही. तरुण विद्यार्थ्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला सोबत न घेता स्वयंस्फूर्त आंदोलन केले. स्वतःच्या प्रश्नांवर राजकारण करण्याचा अधिकार त्यांना नाही, हे कोणी समजून सांगायला भाजप सारखे पापमुक्त पक्ष समोर आले नाहीत. हे या आंदोलनकर्त्या तरुणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

केवळ सत्तेसाठी राजकारण असतं अधिकारांसाठी नसतं हे आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गरज आहे. अंध भक्त थोडे डोळस झाले की, सत्ताधार्‍यांना आज-काल राजकारणाचा वास येऊ लागला आहे. ही चूक खरच सत्ताधार्‍यांची नाही. कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे. त्यांनी सत्तेसाठी कशी गोळा बेरीज केली त्यांचं त्यांनाच ठाऊक.

 विद्यार्थी व तरुणांना त्याच्याशी काही देणे-घेणे असण्याचे कारण नाही. सत्ताधारी राजकारणी जे देतील ते गप्प गुमानं स्विकारलं पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार तरुण व शिक्षण घेऊन भविष्यात आपल्याला चांगली नोकरी लागेल या अपेक्षेने शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. असं म्हटल्यास देवेंद्रजी आपल्याला राग यायला नको. राजकारण हा लोकशाहीचा श्वास आहे.

 याच राजकारणातून सामान्य मतदारांना विविध राजकीय पक्षांची ध्येयधोरणे लक्षात येतात. परंतु आज ध्येयधोरणाला कोण विचारतो? जात, धर्म, पैसा आणि भावनिक मुद्यांवर मतदान करणार्‍यांना सत्ताधार्‍यांच्या निर्णयात राजकारण करण्याचा म्हणजे विरोध करण्याचा अधिकार याच माय-बाप मतदारांनी केंव्हाच संपवला आहे. लोकशाहीला एकांगी निर्णय घेणारी सत्ता व शासन प्रणाली अपेक्षित नाही. लोकशाही शासन प्रणालीत लोकाभिमुख निर्णय घेणारी असावी अशी मुळातच चुकीची धारणा लोक कशी काय बाळगू शकतात. 

कंत्राटी भरतीचा निर्णय जो रद्द केला तो लोकाभिमुख आहे. हा निर्णय जाहीर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शासनाने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेतला होता, असे  सांगितले. फडणवीस यांनी खरे तेच सांगितले.

 कंत्राटी भरतीचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने घेतलेला निर्णय कोणत्या वर्गाच्या पदासाठी आणि किती पदांसाठी होता, हे सांगायला देवेंद्रजी कदाचित विसरले असतील. बरं त्यांनी हा घेतलेला निर्णय असेलही परंतु त्याची अंमलबजावणी करण्याची तुम्हाला काहीच गरज नव्हती ना?, का राज्य मंत्रिमंडळाच्या संम्मतीविनाच एखाद्या सचिवाने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जारी केला. 

हेही स्पष्ट व्हायला हवे. तुम्ही म्हणाला ते खरं आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेचेच आहे. पण कळत नकळत या पापात आपण कसे काय सामील झालात?, या पापाचं ओझं तुमच्या डोक्यावर कसं बरं आलं?, या प्रश्नांची उत्तरे आम्ही का बरं शोधायचा प्रयत्न करायचा. विरोधी पक्ष खरचं राजकारण करत आहे.

 तुम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयाचं कौतुक करण्याऐवजी आपल्या मंत्री व विधान परिषदेतील आपल्या आमदारांच्या कंपन्यांना मागच्याच म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मनुष्यबळ पुरवठ्याची भली मोठी कंत्राटे दिली तरी कशी? आणि का याचही उत्तर आम्हाला शोधायची गरज नाही. शेवटी खरच हे पाप तुम्हा राजकारण्यांचं नाही कारण भाजप असो की, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना (दोन्ही गट) यांना निवडून देण्याचे काम भाबड्या मतदारांनीच केलं.

 त्यामुळे हे पाप तुम्हा राजकारण्यांचं नाहीच आम्हा मतदारांचं आहे, याचे विस्मरण आम्हाला होत आहे. बर झालं तुम्ही पाप-पुण्याचा विषय काढला. भविष्यात मतदार पापाऐवजी पुण्य करण्याचा विचार करतील, अशी अपेक्षा करायला सध्या तरी काही हरकत नाही. 

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]