राहुल गांधींना मुंबईत भाजपकडून काळे झेंडे
संघ विरोधात वक्तव्य प्रकरणी न्यायालयात हजेरी
ठाणे: न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर होण्यासाठी जात असतांना कॉंग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. दरम्यान आरएसएस विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात राहुल गांधींना आज जामीनदार बदलण्यास न्यायालयाने मंजुरी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल मानहानी खटल्याच्या सुनावणीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी (21 फेब्रुवारी) भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. लोकसभा निवडणूक 2014 दरम्यान भिवंडीतील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून राजेश कुंटे यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. या खटल्यात राहुल गांधी यांचे जामीनदार माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर होते. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन जामीनदार म्हणून न्यायालयाने मंजुरी दिली.राहुल गांधी यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. नवीन जामीनपत्र न्यायालयाने स्वीकारले असून पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे.दरम्यान, राहुल गांधी भिवंडी न्यायालयाकडे जात असताना ठाण्यातील मुलुंड टोल नाका येथे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. नवघर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात यापूर्वी राहुल गांधी यांचा जामीन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी घेतला होता. नुकतेच त्यांचे निधन झाल्यामुळे नवीन जामीनदार देणे आवश्यक असल्याने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन सादर केला. न्यायालयाने तो मंजूर केला आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी स्पष्ट केले की, माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही प्रक्रिया केवळ जामीनसंदर्भातील आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार असून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीसांच्या ताब्यातील ट्रॅक्टर व डीजे तरुणांनी पळवला
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड/प्रतिनिधी-शिवजयंतीच्या मिरवणुकीत विना परवानगी डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर करुन सार्वजनिकरित्या उपद्रव करीत होते. सदरील डीजे व ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त करुन कारवाईसाठी घेवून जात असतांना सात ते आठ जणांनी पोलीसांसोबत वाद घालून सदरील ट्रॅक्टरसह डीजे पळवीला आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. राज कॉर्नर ते आयटीआय चौक दरम्यान मिरवणुकीत अवैधरित्या डीजे सिस्टीम लावून कर्कश आवाज मोठ्याने चालू ठेवण्यात आला होता. मिरवणूक संपल्यानंतर पोलीसांनी डीजे सिस्टम व ट्रॅक्टर ताब्यात घेवून कारवाईसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्यात घेवून जात असतांना शुभम दिलीपराव कल्याणकर रा. तरोडा, आशुतोष भास्कर शिंदे रा. गजानन महाराज कमान, मालेगाव रोड, नांदेड, अवतारसिंघ चंदनसिंघ बाजवा रा.नंदीग्राम सोसायटी, केदारनाथ कैलास कपाटे व इतर तीन ते चार जणांनी पोलीसांसोबत हुज्जत घातली. ट्रॅक्टर व डीजे कारवाईसाठी पोलीसांना रोखून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदरील डीजे व ट्रॅक्टर आरोपींनी पळवून नेले. याप्रकरणी पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार आनंदा बोकारे यांच्या मुलाला भरदिवसा लुटले
नांदेड/प्रतिनिधी-सोमेश्वर ता.नांदेड येथील पत्रकार आनंदा बोकारे यांच्या मुलाला आज (शनिवार) सकाळी स्टेडियमच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली आहे.
नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून विधीसंघर्ष मुलं त्यामध्ये आघाडीवर आहेत. पत्रकार आनंदा बोकारे यांचा मुलगा ओमकार बोकारे हा आज (शनिवार) सकाळी यशवंत महाविद्यालयातून पायी स्टेडियममार्गे बसस्थानकाकडे जात असतांना स्टेडियमच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्यास अडविले. ओमकार बोकारे यांच्यासोबत असलेल्या मित्रांना धमकी देवून निघुन जाण्यास सांगितले. ओमकारला मारहाण करुन ब्लेडने अंगावर जखमा करण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याच्या हातातील चार तोळ्याचे चांदीचे ब्रासलेट हिसकावून घेवून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पत्रकार आनंदा बोकारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
==============
मजुरांच्या वस्तीतील 19 झोपड्यांना भीषण आगमजुरांच्या वस्तीतील 19 झोपड्यांना भीषण आग
सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे: हडपसर येथील राममनोहर लोहिया उद्यानाजवळील मजुरांच्या वसाहतीत शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून 19 झोपड्या तसेच तीन दुचाकी भस्मसात झाल्या. सुदैवाने प्रसंगावधान राखत मजूर व त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटना पुणेसोलापूर रस्त्यालगत असलेल्या राममनोहर लोहिया उद्यानाच्या मागील बाजूस घडली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीतील एका झोपडीला अचानक आग लागली. या झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याच्या साहाय्याने उभारण्यात आल्या असून आतमध्ये गृहोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले होते. साहित्याने पेट घेतल्याने काही क्षणांतच आग भडकली आणि शेजारील झोपड्यांनाही विळखा घातला.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब व टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे आणि विलास दडस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीत 19 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून तीन दुचाकीही जळून नुकसान झाले. कपडे, धान्य, घरगुती साहित्य यांसह जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
===============
केंद्रीय मंत्र्यांसह अधिकार्यांचे राजीनामे घ्या-आ.रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार मृत्यू प्रकरण
मुंबई/प्रतिनिधी-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू व डीजीसीए मधील श्वेता सिंह यांचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे अशी मागणी आ.रोहित पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली व मुंबई येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.रोहित पवार यांनी संबंधित व्हीएसआर विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कंपनीच्या पाठीशी काही प्रभावशाली लोक असल्यामुळे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप केला. तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.विमानात अतिरिक्त इंधन का भरण्यात आले, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की, विमानात जाणीवपूर्वक अतिरिक्त पेट्रोल साठा होता का, याची चौकशी व्हावी. या कारणामुळे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.रोहित पवार यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. मी या प्रकरणी प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप पुरस्कृत ट्रोलर्स माझ्याविरोधात सक्रिय झाले. माझ्या प्रवासाची, मी कोणत्या विमानाने कुठे जातो, माझ्यासोबत कोण असते याची माहिती त्यांच्याकडे कशी पोहोचते? मात्र आम्हाला अजित पवार यांच्या विमान प्रवासाबाबतची माहिती दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.माहिती अधिकारांतर्गतही माहिती नाकारली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. डीजीसीएतील अधिकारी कॅप्टन श्वेता सिंह यांच्या भूमिकेवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या अत्यंत प्रभावशाली असून एव्हिएशन क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत त्यांचा सहभाग असणे योग्य नाही. त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.या आरोपांमुळे केंद्र व राज्याच्या राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित मंत्रालय किंवा अधिकार्यांकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
=========
लाचखोर मुंडेच्या घरावर‘एसीबी’चा छापा
13 तोळे सोन्यासह रोख रक्कम व ऐवज जप्त
नांदेड/प्रतिनिधी-बीड जिल्ह्यातील परळी येथे 50 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडलेल्या तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या नांदेड येथील यशोविहार भागातील घरावर टाकलेल्या छाप्यात 13 तोळे सोने आणि 55 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ही कारवाई केली. सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मुंडे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पडताळणीदरम्यान त्यांनी चिठ्ठीवर 50 असा आकडा लिहून लाच मागितली. त्यानंतर रक्कम 25 हजारांवर आणण्यात आली. तक्रारदाराने 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर आणखी तीन टाका असे म्हणत 23 हजारांची मागणी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने तीन वेळा सापळा रचला. मात्र कारवाईचा संशय आल्याने मुंडे यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. कारवाईनंतर नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या झडतीत 13 तोळे सोने, 55 हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. तहसील कार्यालय परिसरात काही नागरिकांनी फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले. ग्रामस्थांनी प्रशासनातील मनमानी थांबविण्याची मागणीही यावेळी व्यक्त केली.
===============
अर्धापूरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून
अर्धापूर/प्रतिनिधी-अर्धापूर शहरात जाणार्या मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाला आहे. ही घटना दि.20 शुक्रवारी रोजी रात्री साडे 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटने बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरात जाणार्या मुख्य रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात चांदु दिगंबर वाघमारे यांचे घर आहे. त्यांच्या शेजार्यांनी आमच्या घरावर का दगड फेकले म्हणून वाद केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक चित्तरंजन ढेमकेवाड जमादार विजय आडे, महेंद्र डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केले व तसेच दुचाकीची तोडफोड केली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश
मयत व्यंकटी चांदु वाघमारे हा तरूण घरात जेवण करित होते. बाहेर रस्त्यावर भांडण सुरू आहे. हे कळताच तो बाहेर आला व भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
=================
‘मस्साजोग’फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावात आल्याचा दावा
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनवेळा गावात आला होता. असा खळबळजनक आरोप मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस व वेगवेगळ्या यंत्रणांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राज्यशासनाने एसआयटी नेमली आहे. एसआयटीसह स्थानिक पोलीसांनी तपास करुन प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे पोलीस व यंत्रणांना चकवा देवून फरार झाला आहे. तो अजुनही पोलीस व तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक दावा धनंजय देशमुख यांनी आज केला आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, वाल्मीक कराड, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीने तब्बल 1800 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून मकोका अंतर्गत आरोप निश्चित झाले आहेत. मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.धनंजय देशमुख यांनी सांगितले की, कृष्णा आंधळे गावात येतो, लोकांशी संवाद साधतो आणि पुन्हा पसार होतो. याबाबतची सर्व माहिती आम्ही सीआयडीला दिली आहे. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे अधिक कठीण झाले असल्याचे समजते. देशमुख कुटुंबीयांनी आरोपीकडून जीवितास धोका असल्याचा दावा केला आहे. त्याला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी. आरोपींची जिल्हाभर दिंड काढावी, जेणेकरून गुन्हेगारांना धडा मिळेल, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.दरम्यान, बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कुटुंबीय प्रयत्नशील असून सर्व पुरावे तपास यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
============
अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर केरुर-हिब्बट-एकलारा-खानापुर
मुखेड/प्रतिनिधी-मागील अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर केरुर-हिब्बट-एकलारा-खानापुर रस्त्याचे काम सुरु झाले आहे. हे जनआंदोलनाचे व आ. डॉ.तुषार राठोड यांच्या प्रयत्नाचे यश असल्याचे मानले जात आहे.2019 पासुन मुखेड-हिब्बट-एकलारा-खानापुर या रस्त्याच्या दर्जावाढीनंतर डाबरीकरणाचे व नुतणीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यानी सुरु केले आहे.
हा रस्ता लोहा-कंधार-मुखेड-खानापुर-बोधन प्रमुख राज्यरस्ता क्र. 16 चा भाग आहे. या रस्त्याचे मागचे व पुढचे काम झाले आहे. मात्र केरुर-बोरगांव-हिब्बट -धनज ते एकलारा या 15 कि. मी. रस्त्याचे काम 2019 पासून या भागातील काही गावातील शेतकर्यांनी अडविलेले होते, त्यामुळे रस्त्याची साधी दुरुस्तीसुद्धा न केल्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. परिणामी या रस्त्यावरील प्रवासी वाहतुक व माल वाहतुक, खाजगी वाहनाची वाहतुक व सार्वजनीक बससेवा ही सर्व वाहतुक मागील 6 वर्षापासुन बंद होती. सर्व दळणवळण बंद झाल्यामुळे या 15 कि.मी. अंतरातील परिसरातील गावक-याचे प्रचंड हाल झाले आहेत. दळणवळणाच्या सेवेपासुन या परिसरातील गावे वंचित झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सार्वजनीक बांधकाम विभाग नांदेड यांच्या प्रयत्नाने व आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नामुळे तसेच एकलारा परिसरातील जनतेच्या जनआंदोलनामुळे या रस्त्याच्या कामातील अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता या रस्त्याचे काम केरुर पासुन व एकलारा पासुन दोन्ही बाजुनी सुरु झाले आहे. या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे या परिसरातील सर्व गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. डॉ. तुषार राठोड यांनी शेतकर्यांशी हितगुज करून या रोडचे काम चालू केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.रस्त्याचे काम सुरु


0 टिप्पण्या