‘निजामुद्दीन’हून अकरा जण नांदेडात दाखल
त्यापैकी नऊ जण दवाखान्यात तर दोन जणांचा शोध सुरु
नांदेड/प्रतिनिधी-गेल्या तीन दिवसांपासून संपुर्ण देशभरात गाजत असलेल्या नवी दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले 11 जण नांदेडचे आहेत. ते सर्व जण नांदेडात दाखल झाले. त्यांच्यापैकी 9 जणांचा शोध घेवून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांचा तपास चालु असल्याचे सुत्रांनी सांगितले.
कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या वातावरणामुळे संपुर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज दि.1 एप्रिल रोजी या लॉकडाऊनचा आठवा दिवस आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी नवी दिल्ली येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी निजामुद्दीन मस्जिदीमध्ये मोठा जमाव जमल्याचे प्रकरण उघडकीला आले. निजामुद्दीन मस्जिदीमध्ये तबलिग-ए-जमात या मुस्लिम धर्मप्रचारक संघटनेने आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून असंख्य जण सहभागी झाले होते.
देशात सर्वत्र जमावबंदी असतांना निजामुद्दीन मस्जिदीत इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने लोकांना धक्काच बसला. त्या लोकांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी तब्बल 24 जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर इज्तेमा आटोपून आपआपल्या राज्यात शेकडो लोक परत गेले होते. त्यांच्यापैकी सहा जण तेलंगणामध्ये एक जण काश्मिरात तर एक जण तामिळनाडूत कोरोनामुळे मरण पावल्याचेही खात्रीपूर्वक समजले आहे.
निजामुद्दीनमधील इज्तेमासाठी महाराष्ट्रातून सुमारे 110 लोक गेले होते. त्यांच्या पैकी 11 जण नांदेडचे होते. ते सर्व जण नांदेडमध्ये परत आले आहेत. याची माहिती वरिष्ठ पातळीवरुन जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. मंगळवार दुपारपासून प्रशासनाने तबलिगी मर्कझमध्ये सहभागी झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 11 जणांचा शोध सुरु केला. निजामुद्दीनचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. नांदेडातील 11 जणांचा शोध सुरु केला. त्यांच्यापैकी 9 जणांना ताब्यात घेवून सरकारी दवाखान्यामध्ये तपासणी व अन्य उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका जणास पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांचा शोध चालू असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर हे 11 जण नांदेडात आल्यापासून कोणा-कोणाच्या संपर्कात आले होते, कोणाला भेटले होते त्याचाही तपास चालू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
0 टिप्पण्या