Header Ads Widget

1) महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग 2) व्यवस्था परिवर्तन हेच साहित्याचे अंतिम ध्येय-कवी लोकनाथ यशवंत 3) अंबाडी घाटात कार रपट्याखाली कोसळून आगीत खाक 4) दोनशे कोटींचे टेंडर देवूनही नांदेडकरांच्या नशिबी जागोजागी कचर्‍याचे ढिग

 


महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग



अमेरिका-इस्त्रायलकडून इराणवर हल्ले;

प्रत्युत्तरात इराणने 8 देशांवर क्षेपणास्त्र डागले

तेहरान: अमेरिका व इस्त्रायलकडून इराणवर झालेल्या हल्ल्‌यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच चिघळली असून इराणने जोरदार प्रत्युत्तर देत खाडी प्रदेशातील अनेक देशांकडे क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या ऑपरेशन रोरिंग लायननंतर इराणने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जगात  युद्धाचे सावट दाटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आज अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराणची राजधानी तेहरान शहरावर भीषण हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीनसह काही देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे वृत्त आहे. या कारवाईकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाडी सुरक्षाविषयक धोरणाला दिलेले थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी खाडी देशांना सुरक्षेची हमी दिली होती.यूएई, बहरीन, कुवैत, कतार, ओमान, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इराक या देशांमध्ये अमेरिकेची महत्त्वाची लष्करी तळे आहेत. इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की त्यांच्या भूमीवर हल्ला झाल्यास अमेरिकेला आश्रय देणार्‍या देशांनाही लक्ष्य केले जाईल.दुबई आणि बहरीनची राजधानी मनामा परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तथापि, या देशांकडे असलेल्या पॅट्रियटसारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनी अनेक क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणमध्ये सत्ताबदल होईपर्यंत कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेत सरेंडर करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिल्याचे वृत्त आहे. या विधानांमुळे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक तेलबाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खाडी प्रदेशातील अस्थिरता जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर ठरू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून पुढील काही दिवसांत घडणार्‍या घटनांवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

या युद्धाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. इराण-इस्त्रायल-अमेरिकेत युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून मायदेशी परत येण्यासाठी मदतीची याचना केंद्र सरकारकडे करणारे व्हिडीओ प्रसारीत होत आहेत. 


घुसखोरांवरुन विधीमंडळात घमासान

मुंबई/प्रतिनिधी-मुंबईसह देशभरात बांगलादेशी घुसखोरीवरुन विधान परिषदेत आज शिवसेना (ठाकरे) गटाचे आ.अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात चांगलेच घमासान घडले. आ.परब यांनी केलेल्या आरोपांना मंत्री कदम यांनी त्याच आक्रमक शब्दात उत्तर दिले. 

विधान परिषदेत बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे गट) आ.अनिल परब आक्रमक झाले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांना आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले. सभागृहात दोन्ही बाजूंमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी शहरातील विविध झोपडपट्‌ट्यांमध्ये बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा दावा केला होता. महापालिकेतील काही आरोग्य अधिकार्‍यांना पैसे देऊन बनावट जन्म प्रमाणपत्रे मिळविल्याचेही समोर आले असून आतापर्यंत 237 बोगस जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.अनिल परब यांनी सभागृहात बोलताना बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा हा राजकीय नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे ठामपणे सांगितले. मुंबईत अशी कोणतीही वस्ती नाही जिथे बांगलादेशी राहत नाहीत. त्यांनी झोपडपट्‌ट्या उभारून कारखाने सुरू केले आहेत. पोलिसांना आणि पालिकेला याची माहिती नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.टास्कफोर्स स्थापन करून पुढील तीन महिन्यांत प्रत्येक वस्तीत सखोल तपासणी करणार का? कोंबिंग ऑपरेशन होणार का? असा थेट प्रश्न त्यांनी सरकारला केला. तसेच डान्सबार कारवायांचा मुद्दाही उपस्थित करत त्यांनी कारवाईबाबत शंका उपस्थित केली.यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमण्यात आल्याचे सांगितले. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली पाच कर्मचार्‍यांची टीम केवळ बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करत आहे. एटीएसच्या सहकार्याने काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


व्यवस्था परिवर्तन हेच साहित्याचे अंतिम ध्येय-कवी लोकनाथ यशवंत


नांदेड/प्रतिनिधी-व्यवस्था परिवर्तन हेच साहित्याचे अंतिम ध्येय असले पाहिजे,  विद्रोही साहित्याची परंपरा सुरूच असून त्याची गुणवत्ता काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे, असे मत 20 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांनी केले. 

नांदेड येथील नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव पाटील क्रिडा संकुल मैदानात उभारलेल्या राजा ढाले साहित्य नगरी येथे आजपासून तीन दिवसीय 20 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्ष कवी लोकनाथ यशवंत यांनी सामाजिक परिवर्तन, स्वपरीक्षण आणि मानवमुक्तीचा ठाम संदेश दिला. कविता ही आपल्या जीवनाचा श्वास असून ती सामाजिक वास्तवाची पहिली प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, चळवळीतील नेतृत्व आणि स्वपरीक्षण या मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ दिला. काफिला पुढे न्या, पण मागे खेचू नका, हा संदेश स्मरणात ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नेतृत्वातील स्वार्थी प्रवृत्तीमुळे चळवळीचे नुकसान होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. धर्माच्या नावाखाली वाढणार्‍या अंधश्रद्धा आणि दंगलींवर त्यांनी तीव्र टीका केली. धर्म माणसासाठी असावा, माणूस धर्मासाठी नसावा, अशी स्पष्ट भूमिका मांडत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जागतिकीकरणामुळे सामान्य माणसाचे होणारे नुकसान आणि महासत्तांच्या स्वार्थी धोरणांवर त्यांनी भाष्य केले. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी मनं जुळली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बायोस्कोप या चित्रपटात समाविष्ट झालेल्या त्यांच्या बैल कवितेचा उल्लेख करत त्यांनी शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. कविता ही केवळ घोषणाबाजी नसून क्रांतिदर्शी, क्रांतिसन्मुख आणि परिवर्तनशील असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. संमेलनाध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. यावेळी उद्घाटक डॉ.बजरंग बिहारी तिवारी यांनी विद्रोही साहित्याचे महत्व अधोरेखीत केले. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक राणा, दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील प्रा.डॉ.मिलिंद आव्हाड यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले तर स्वागताध्यक्ष राहुल एस.एम.प्रधान यांनी सर्व साहित्यिक व साहित्य प्रेमींचे नांदेड नगरीत स्वागत केले. या अधिवेशनामागची भूमीका विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी यांनी विषद केली. प्रारंभी महात्मा फुले यांच्या सत्याचा अखंड या गीताचे गायन नंदुरबार येथील शीतल गावीत यांच्या संचाने सादर केले. तर धुळ्यातील अमृत भिल यांनी पावरी वादन, ‘वंदन माणसाला’ या वामनदादा कर्डक लिखित गीताचे गायन सुनील हाटकर यांनी केले. विद्रोही संमेलन गीत डॉ.आदिनाथ इंगोले यांनी गायीले. या संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते विषमत्तेची उतरंड फोडून करण्यात आले. 


अंबाडी घाटात कार रपट्याखाली कोसळून आगीत खाक


मांडवी/प्रतिनिधी-किनवट-आदिलाबाद मार्गावरील अंबाडी घाटात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक अज्ञात कार थेट रपट्याखाली कोसळली आणि झाडाला धडकून लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, काही वेळातच कारचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

आज मध्यरात्री अंदाजे एक वाजेच्या सुमारास अंबाडी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रपट्याखाली कोसळली. खाली कोसळल्यानंतर कार रपट्यालगत असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली आणि कारने अचानक पेट घेतला. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वेळातच कार जळून खाक झाली. या भीषण आगीत कारमधील प्रवाशांबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. प्रवाशांचे काय झाले किंवा ते सुरक्षित आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्री. ओंकार पूरी व पोलीस शिपाई श्री.डगवाल या घटनेचा आणि कार मालकाचा शोध घेत आहेत. अंबाडी घाटातील धोकादायक वळणे अनेकदा अशा अपघातांना निमंत्रण देतात. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनधारकांनी अधिक सावधगिरीने गाडी चालवावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे.


दोनशे कोटींचे टेंडर देवूनही नांदेडकरांच्या नशिबी जागोजागी कचर्‍याचे ढिग




नांदेड/प्रतिनिधी-नांदेड शहरातील स्वच्छता व कचरा संकलनासाठी 200 कोटी रुपयांचे टेंडर अमृत इंटरप्रायजेस या कंपनीला दिल्यानंतरही नांदेडकरांच्या नशिबी मात्र जागोजागी कचर्‍याचे ढिग साचलेले आहेत. प्रशासकाच्या काळात सदरील टेंडरमध्ये झालेली अनियमितता व अधिकार्‍यांचा झालेला आर्थिक फायदा यास कारणीभूत आहेत. 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छता व कचरा संकलनासाठी 200 कोटी रुपयांचे टेंडर अमृत इंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आले. सदरील टेंडर बाबत मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी टेंडरमध्ये झालेल्या अनियमितेबाबत आवाजही उठविला नाही. लोकप्रतिनिधी हे प्रशासक व अधिकार्‍यांच्या सुरात सुर मिसळून मुग गिळून गप्प बसले. मात्र जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी स्वच्छतेच्या टेंडरमध्ये झालेल्या अनियमितेबाबत आवाज उठविला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने सदरील टेंडर अमृत इंटरप्रायजेस या कंपनीला मंजूर करण्यात आले. पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छतेचे टेंडर आर ऍण्ड बी या कंपनीला वार्षीक 100 कोटी रुपयांना देण्यात आले होते. परंतु प्रशासकांच्या काळात स्वच्छतेच्या कामाचे टेंडर दुप्पट करुन अमृत इंटरप्रायजेसला काम देण्यात आले. सदर एजन्सीच्या मार्फत काही महिन्यापासून शहरात स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले आहे. अधिकार्‍यांसोबत असलेली घट्ट आर्थिक मैत्रीचा फायदा घेत कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंत्राटी स्वच्छता कामगारांना कामावरुन कमी करण्यास सुरुवात केली आहे. काही कामगार पूर्ण एक महिना काम केल्यानंतरही त्यांच्या खात्यावर कमी दिवसाचा पगार जमा केला जात होता. कामगारांची आर्थिक पिळवणूक कंपनीने सुरु केली. व्यवस्थापना विरुद्ध कामगार संघटनांना अनेकवेळा आंदोलनेही करावी लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने 45 जागा जिंकुन स्पष्ट बहुमत मिळविले आहे. शहराच्या विकासासाठी खा.अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना मोठमोठी आश्वासने दिली आहेत. परंतु शहरातील रस्त्यांचा दर्जा व अस्वच्छता याविषयी मात्र त्यांनी चुप्पी साधली. महापालिकेत पहिल्यांदाच भाजपच्या सौ.कविता संतोष मुळे व उपमहापौरपदी नगरसेवक दीपकसिंह रावत यांची निवड झाल्यानंतर पदाधिकार्‍यांनी शहराच्या विकासासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेवून पदाधिकारी व आयुक्तांनी  जाहीर केला. दुसर्‍या दिवशी मात्र सदरील कृती आराखडा म्हणजे नांदेडकरांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे हे स्पष्ट झाले. स्वच्छतेसाठी 200 कोटी रुपयांचे टेंडर घेणार्‍या अमृत इंटरप्रायजेस या कंपनीने प्रशासनाला कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता शंभर स्वच्छता कंत्राटी कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केल्याने स्वच्छता कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचलेले आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिणा सुरु असून प्रार्थंनास्थळाजवळ कचर्‍याचे ढिग जमा झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिकेकडे यापूर्वी अनेक स्वच्छता कर्मचारी कार्यरत होते. सध्या ते कर्मचारी कुठे आहेत व कोणाच्या घरी काम करीत आहेत. हा एक संशोधनाचा विषय आहे. रस्त्यांवरच ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचल्याने दुर्गंधी सुटली असून त्याचा त्रास नांदेडकरांना होत आहे. मनपा प्रशासनाने कागदोपत्री एजन्सीला नोटीस दिली असली तरी कंपनीकडून शहरातील स्वच्छते संदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. कंत्राटी स्वच्छता कामगारांचे आंदोलन सुरुच असून घंटागाड्या बंद आहेत. शहरातील अस्वच्छतेचा फटका नांदेडकरांना बसत असून शहरातील स्वच्छतेसाठी दोनश कोटी रुपयांचे टेंडर देवूनही नांदेडकरांच्या नशिबी मात्र जागोजागी कचर्‍याचे ढिग साचलेले आहेत. नांदेड शहरात इंदौर पॅटर्न राबविण्याचे स्वप्न दाखविणार्‍या सत्ताधार्‍यांनीही महापालिकेतील अनियमितता व भ्रष्टाचाराचे प्रकरणे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]