नांदेडमध्ये वादळी वार्यासह पावसाची हजेरी
राज्यात पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
नांदेड/प्रतिनिधी-मराठवाड्यात हवामानाने अचानक पलटी घेतली असून आज पहाटे नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. तर आज दुपारी पुन्हा वादळी वार्यासह पावसाने थोडावेळ हजेरी लावली. राज्यात एकीकडे प्रखर उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस वीजांचा कडकडाट, वादळी वार्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या 48 तासांपासून पावसासाठी पूरक वातावरण तयार होत असून विशेषतः मराठवाडा विभागात हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. नांदेडसह लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत तुरळक सरींची नोंद झाली. हवामान खात्याने मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वातावरण अस्थिर झाले असून मेघगर्जना आणि वादळी वार्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत वादळी वार्यांसह मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी मराठवाड्यात दिवसभर उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास तापमान 35 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा अधिक जाणवेल.हवामानातील या सततच्या बदलामुळे सर्दी, ताप, घशाचे विकार तसेच उष्माघाताचा धोका वाढू शकतो. नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे आणि विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अवकाळी पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी सतर्क राहावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामानातील ही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नांदेडसह राज्यातील 22 जि.प.च्या निवडणुका लांबणीवर
सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारची विनंती फेटाळली
नवी दिल्ली: राज्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षणाच्या ट्रिपल टेस्ट शिवाय घेता येणार नाहीत असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. त्यामुळे नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अमरावती, नाशिक, नागपूरसह 22 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बराचकाळ प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नगरपरिषद, नगरपंचायत पाठोपाठ महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांनंतर राज्यातील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या बारा जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या. त्याचे निकाल हाती आले असून या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर लोकप्रतिनिधींचे शासन प्रस्थापित झाले आहे. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादा ओलांडलेल्या 22 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणार्या पंचायती समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याविषयी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास मनाई केली आहे. राज्य सरकारने विशेष परिस्थितीचा दाखला देत निवडणुका घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची घटनात्मक मर्यादा स्पष्ट करत ही मागणी फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, आरक्षणाची मर्यादा ओलांडताना आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया आणि त्रिसूत्री चाचणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.घटनात्मक तरतुदींनुसार एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्देश आहे. काही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ओबीसीसह इतर प्रवर्गांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक झाल्याने हा वाद निर्माण झाला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ राजकीय किंवा प्रशासकीय कारणांमुळे आरक्षण मर्यादा शिथिल करता येणार नाही. यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना, मागासवर्गीयांचा अद्ययावत डेटा आणि ठोस अहवाल आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांमार्फत कारभार सुरू राहण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सत्ताधार्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याची भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा अंतिम निर्णय आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे.
इंजेगाव, नागापूर, वांगी, सिद्धनाथ, पुणेगाव ठिकाणी पोलीसांच्या धाडी
पाच बोटी, पन्नास तराफेसह अडीच कोटींचा ऐवज जप्त
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैधरित्या रेती उपसा करणार्या विरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरु केली असून रविवारी पाच ठिकाणी धाडी टाकुन 2 कोटी 63 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी रेती माफिया विरुद्ध कारवाईचे सत्र धाडसी पणाने चालू आहे. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंजेगाव, नागापूर, मौ.वांगी, सिद्धनाथ व पुणेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर, फौजदार कुसमे, फौजदार भिसे व पोलीस कर्मचार्यांनी रविवारी दुपारपासूनच नदी घाटाच्या ठिकाणी धाडी टाकण्यास सुरुवात केली. पोलीसांना बघून रेती उपसा करणारे पाण्यात उड्या मारुन पळून गेले. नागापूर, इंजेगाव, मौ.वांगी, पुणेगाव व सिध्दनाथ येथे गोदावरी नदीच्या पात्रातून रेती उपसा करणारे पाच लोखंडी बोटी, पाच फायबर बोटी, तीन इंजीन, 50 तराफे, 85 ब्रास रेतीचा साठा असा 2 कोटी 63 लाख रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. सदरील बोटीबाबत पोलीसांनी चौकशी केली असता त्या करण सोनटक्के, शहाजी सोनटक्के, छगन बुक्तरे रा.ब्राह्मणवाडा व गजानन मस्के रा.नागापूर यांच्या असल्याचे समजले. नदीपात्रात आढळून आलेल्या बोटी, तराफे व इंजीन पंचासमक्ष हायड्रोजन गॅस कटरच्या साह्याने कट करुन जाळून नष्ट करण्यात आले. नदी किनारी साठा करुन ठेवलेल्या रेतीचा साठा पोलीसांनी खाजगी वाहनाद्वारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई गवेंद्र सिरमलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार जणांविरुध्द विविध कलमान्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यमंत्रिमंडळात तात्पुरते बदल
एकनाथ शिंदेंचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई/प्रतिनिधी-राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताब्यातील काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे.
शिंदे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली असून, गृहनिर्माण खात्याची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीपुरती ही तात्पुरती तजवीज करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अधिवेशन काळात शिंदे यांच्या खात्यांबाबत विरोधी पक्षांकडून विचारल्या जाणार्या प्रश्नांना संबंधित जबाबदारी मिळालेल्या मंत्र्यांकडून उत्तरे दिली जाणार आहेत. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत एकाच वेळी प्रश्न उपस्थित होत असल्याने कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी ही प्रशासकीय सोय करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सभागृहात परिचय करून देण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून शोकप्रस्ताव मांडण्यात आला.विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित राहून शोक व्यक्त करत आहेत. त्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेच्या नियमित कामकाजास प्रारंभ होणार आहे. वंदे मातरम् आणि राज्यगीताने कामकाजाची सुरुवात करण्यात येणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधार्यांविरोधात जोरदार आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिडको-हडको परिसरात औद्योगिक कारखान्यांच्या काळ्या राखेचा नागरिकांना त्रास
नांदेड/प्रतिनिधी-सिडको-हडको परिसरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतून उत्सर्जित होणार्या काळ्या राखेच्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत संबंधित कारखान्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत सिडकोतील नगरसेवक व प्रतिनिधी सदस्यांनी प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांना निवेदन सादर केले. सिडको-हडको परिसरात यापूर्वीही औद्योगिक प्रदूषणाच्या विरोधात निवेदने देण्यात आली होती. काही दिवस प्रदूषण नियंत्रणात आले असले तरी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा काळ्या धुळीचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत. औद्योगिक वसाहतीतील कोहिनूर फिड्स लि., कपिल ऍग्रो, श्रीनिवासा कॅटल फिड्स, सिध्दा रामेश्वरा, श्रीनिवासा ऍग्रो या कंपन्यांच्या चिमण्यांमधून निघणारी राख आणि धूर सिडको-हडको तसेच गुंडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धुळीमुळे घरांच्या गच्च्यांवर व परिसरात ठेवलेली जीवनावश्यक धान्ये, कपडे तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू खराब होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रदूषणामुळे दमा, कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली असून काही नागरिकांना श्वसनाचे त्रास वाढले आहेत. यापूर्वी या कारखान्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्यात आली होती; मात्र प्रदूषण पूर्णपणे थांबले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मनपा प्रभाग क्रमांक 20 चे भाजपा नगरसेवक वैजनाथ देशमुख, सौ. सुवर्णा सतीश बसवदे, सौ. निरंजना राजू लांडगे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, राजू लांडगे, सतीश बसवदे यांच्यासह सिडको-हडको परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित कारखान्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून काळी राख व धुळीचे उत्सर्जन तात्काळ बंद करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. जर प्रदूषण तात्काळ थांबवले नाही, तर सिडको-हडको व गुंडेगाव येथील नागरिकांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे महाशिवरात्री यात्रेतील व्यापार्यांची तारांबळ
हिमायतनगर/प्रतिनिधी-शहर व परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रेत व्यापार्यांची एकच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तंबू, स्टॉल व साहित्य भिजल्याने व्यापार्यांचे नुकसान झाले.
दरम्यान, यात्रास्थळाजवळील विद्युत तारा तुटून खाली पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच तत्काळ वीज पुरवठा पुरवठा करणार्याला माहिती देण्यात आली. संबंधित यंत्रणेने प्रसंगावधान राखत तातडीने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पावसामुळे विद्युत प्रवाह परिसरात पसरला असता तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती, अशी चर्चा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. पावसामुळे यात्रेत आलेल्या भाविकांची काही काळ गैरसोय झाली. वादळी वार्यामुळे काही ठिकाणी स्टॉल कोसळल्याचीही माहिती आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक यात्रा प्रशासन व वीज वितरण विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक ती खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.








0 टिप्पण्या