उद्यापासून सलग 5 दिवस बँका बंद;कामकाज ठप्प
नवी दिल्ली:होळीचा सण आणि त्यानंतरचा विकेंड यामुळे उद्यापासून सलग पाच दिवस अनेक भागांत बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन करावयाची कामे वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार 2 मार्च रोजी होलिका दहन निमित्त काही राज्यांत बँका बंद राहतील. 3 मार्च रोजी धुलिवंदन आणि डोल यात्रेनिमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. 4 मार्च रोजी होळीचा मुख्य सण असल्याने देशातील बहुतांश भागांत बँकांना सुट्टी असेल. यानंतर शनिवार आणि रविवार असल्याने सलग सुट्ट्यांची मालिका तयार होणार आहे.
अरविंद केजरीवाल,सिसोदियांसह 23 जण निर्दोष
‘सीबीआय’च्या तपासावर दिल्ली न्यायालयाचे गंभीर ताशेरे;तपास अधिकार्यांच्या चौकशीचे आदेश
नवी दिल्ली: तत्कालिन दिल्ली सरकारच्या बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस व्हेन्यू विशेष न्यायालयाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि इतरांसह एकूण 23 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल देताना न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि तपास अधिकार्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात 2015 मध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर 2021-22 मध्ये त्यांच्या नेतृत्वातील सरकारने मद्य विक्री धोरण राबविले होते. यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले. याप्रकरणात सीबीआय, ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी छापेमारी करुन त्यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर 21 फेब्रुवारी 2024 रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांना सुमारे 5 महिणे तुरुंगवास भोगावा लागला. तर मंत्री सिसोदिया यांना 17 महिन्याचा कारावास या प्रकरणात भोगावा लागला. या प्रकरणी दिल्लीतील राऊस व्हेन्यू विशेष न्यायालयात प्रकरण सुरु होते. आज या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. केजरीवाल ढसाढसा रडले, तर सिसोदियाही भावूक झाले. या प्रकरणामुळे आम आदमी पक्षाला राजकीय आणि प्रतिमेच्या पातळीवर मोठा फटका बसला होता. न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, मनिष सिसोदिया यांच्याविरोधात कोणताही प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे. मद्य धोरण तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे ही त्यांची प्रशासकीय जबाबदारी होती. मात्र, त्यात वैयक्तिक आर्थिक लाभ, भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराचा ठोस पुरावा सादर करण्यात तपास यंत्रणांना यश आले नाही.सिसोदिया यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी झालेली नसल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. केवळ संशयाच्या आधारे गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप लावणे पुरेसे नसते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.अरविंद केजरीवाल यांच्याबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे नाव केवळ जबाबांच्या आधारे आणि ठोस पुराव्याशिवाय गुन्ह्यात जोडणे हे कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यांना कटाचा भाग ठरवण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करण्यात आले नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.या प्रकरणात हजारो पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या आरोपांना पुष्टी देणारा एकही विश्वासार्ह साक्षीदार न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही, असे न्यायाधीशांनी नमूद केले. मुख्य आरोपी कुलदीप सिंह यांना ठोस पुरावा नसताना आरोपी क्रमांक 1 का बनवण्यात आले, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या मद्य विक्री धोरणावर नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी सुमारे 2026 कोटी रुपयांच्या संभाव्य महसुली नुकसानीचा ठपका ठेवला होता. त्यानंतर जुलै 2022 मध्ये उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली. पुढे सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने स्वतंत्र गुन्हे दाखल केले.सप्टेंबर 2022 मध्ये दिल्ली सरकारने संबंधित मद्य धोरण रद्द केले. या प्रकरणात मनिष सिसोदिया सुमारे 500 दिवस तुरुंगात होते, तर अरविंद केजरीवाल यांनी 177 दिवसांचा तुरुंगवास भोगला. दोघांनाही नंतर जामीन मंजूर झाला होता.या निकालामुळे आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून, विरोधकांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये या निर्णयाचे परिणाम उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.हा न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
सरकार संशयाची भूतं नाचवतंय;राज ठाकरेंचे रोखठोक भाष्य
मुंबई/प्रतिनिधी-दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात सरकार संशयाचं भूत नाचवत आहे. याप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोललं पाहिजे असे रोखठोक भाष्य मनसे नेते राज ठाकरे यांनी याप्रकरणी आ.रोहित पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना केले.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीसाठी पोलीस तक्रार घेत नसल्याने आ.रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय निर्माण झाले आहेत. अपघात धुक्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. रोहित पवार यांनी तांत्रिक बाबी मांडल्या, मात्र त्यांनी तीन ठिकाणी तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही पोलीस तक्रार घेत नाहीत, ही बाब संशय निर्माण करणारी आहे.मरीन ड्राइव्ह येथे एक अधिकारी एफआयआर नोंदवत होते; मात्र त्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी तक्रार घेऊ नये, असे सांगितल्याचे समोर आले. जर कुटुंबातील व्यक्तींना तक्रार द्यायची असेल, तर सरकार अडथळे का आणत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नांदेडमध्ये 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान बहुआयामी कार्यक्रम
नांदेड/प्रतिनिधी-विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आयोजित 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन येत्या 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी नांदेड येथे संपन्न होणार आहे. हे संमेलन राजा ढाले साहित्यनगरी, गजाननराव पाटील क्रीडा संकुल मैदान, सायन्स कॉलेज परिसर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलन संविधानिक मूल्यांना समर्पित असून विविध साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवर चर्चासत्रे, कविसंमेलन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी असणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे, तर उद्घाटन समारंभ 28 फेब्रुवारी रोजी सकाळी होणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली) उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद आव्हाड यांची उपस्थिती राहणार आहे.
विविध सत्रांची रेलचेल
27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पँथर नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित नृत्यनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी सांस्कृतिक विचार यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ, विद्रोही जीवनगौरव पुरस्कार वितरण, इतिहासाच्या विकृतीकरणावर परिसंवाद, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, एकांकिका सादरीकरण, संवाद सत्रे आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात धर्म, संस्कृती आणि संविधान, प्रसारमाध्यमांचे डिजिटल स्वरूप, भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्व, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शेती आणि शेतकरी, स्त्रीमुक्ती, आदिवासी प्रश्न अशा विविध समकालीन विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
युवा व बालमंच
विशेष आकर्षण
1 मार्च रोजी शहीद भगतसिंग युवा मंच अंतर्गत युवा कविसंमेलन, संविधान गीतमाला तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तसेच सत्यशोधक मुक्ताबाई साळवे बालमंच अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा, नाट्य, गीत, कथाकथन आणि एकपात्री प्रयोग सादर केले जाणार आहेत.
समारोप सोहळा
1 मार्च रोजी सायंकाळी समारोप सत्रात प्रा. रत्नलाल (दिल्ली) यांच्या हस्ते समारोप होणार असून डॉ. शरद बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार व ठराव वाचन करण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणार्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. विद्रोही विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे संमेलन नांदेडकरांसाठी वैचारिक आणि सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
होळीनिमित्त सचखंड गुरुद्वार्यात चार दिवस भव्य धार्मिक कार्यक्रम-डॉ.विजय सतबिरसिंघ
नांदेड/प्रतिनिधी-तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब येथे होला महल्ला सणानिमित्त पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 मार्च ते 4 मार्च 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ यांनी दिली.
शिख धर्माची दक्षिण काशी समजल्या जाणार्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरुद्वार्यात दरवर्षी प्रमाणे होळी अर्थात होला महल्ला सणानिमित्त दि.1 मार्चपासून तख्त सचखंड साहिब येथे प्रख्यात कविशर, ढाडी व प्रचारक यांचे सकाळ व संध्याकाळी कीर्तन-प्रवचन होणार आहे. दि.2 मार्च रोजी रात्री सिख सेवक जत्था दिल्ली स्टेट यांच्या वतीने तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या सहकार्याने विशेष कीर्तन दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.3 मार्च रोजी रात्री 9 वाजता भाई जैमलसिंघ सहगल परिवार, मुंबई यांच्या सहकार्याने 76 वा रैण सबाई कीर्तन दरबार आयोजित करण्यात आला असून, या दरबारास मोठ्या संख्येने संगत उपस्थित राहणार आहे. दि.4 मार्च 2026 रोजी होला महल्ला (हल्लाबोल) कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता गुरु साहिबांच्या पवित्र शस्त्रांचे पूजन मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात येईल. त्यानंतर धार्मिक वाणीचे पठन, भजन व तिलक सोहळा पार पडेल. सायंकाळी 4 वाजता अरदासनंतर नगर कीर्तनास प्रारंभ होईल. जत्थेदारसिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली निशान साहिब, घोडे, नगारे, कीर्तनी जत्थे, गतका पथक व हजारो भाविकांच्या सहभागातून हे नगर कीर्तन गुरुद्वारा गेट क्र. 1 पासून सुरू होऊन महावीर चौक (हल्लाबोल चौक), बाऊली साहिब मार्गे गुरुद्वारा नगिनाघाट साहिब येथे जाईल. रहेरास साहिबचा पाठ व अरदास झाल्यानंतर रात्री सुमारे 10.30 वाजता नगर कीर्तनाचा समारोप तख्त सचखंड साहिब येथे होईल. होला महल्ला सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. भाविकांच्या सोयीसाठी लंगर, पिण्याचे पाणी, निवास, वैद्यकीय सेवा, स्वच्छता तसेच 24 तास अतिरिक्त कर्मचारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना गुरुद्वारा बोर्डास देण्यात आल्या आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यघटनेतील‘सेक्युलॅरिझम’चा खरा अर्थ जाणणे आवश्यक-प्रा.शेषराव मोरे
नांदेड/प्रतिनिधी-आज धर्माने भारतीय समाजजीवन व राजकारणाचा ताबा घेतला आहे. राज्यघटनेतील सेक्युलॅरिझमचा खरा अर्थ कुणी समजून घेत नाही. भारतीय राज्यघटनेत सेक्युलॅरिझम हा शब्द बेचाळीसाव्या दुरुस्तीपूर्वी नव्हता, हे खरे नव्हते. सेक्युलॅरिझम या शब्दाचा धर्मनिरपेक्षता असा केला जाणारा अनुवाद चुकीचा आहे. धर्म या शब्दाचा अर्थ निरनिराळ्या पद्धतीने घेतला जातो. भारतीय घटना धर्माचा वाट्टेल तसा अर्थ घेण्यास प्रतिबंध करते. धर्म आणि सेक्युलर ह्या स्वतंत्र संकल्पना आहेत., असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बोलताना व्यक्त केले.
डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राद्वारे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेने सुरुवातीपासून धर्मसंस्थेवर मर्यादा घातलेली होती. कायदा व सुव्यवस्था यांच्या अटीवर धर्माचे पालन करणे बंधनकारक आहे. पारलौकिक जीवन हे धर्माच्या कक्षेत असले तरी ऐहिक जीवन हे राज्यघटनेने संचालित केले जाते. सामाजिक स्वास्थ्याला बाधा येईल अशा रितीने धर्माचे पालन करता येत नाही. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालात राज्यघटनेतील सेक्युलॅरिझम या संकल्पनेवर विविध निर्णय देऊन ही संकल्पना स्पष्ट केले आहे. धार्मिक नितीमत्तेपेक्षा सांविधानिक नितीमत्ता महत्त्वाची आहे. धर्मानुसार नितीमत्ता पाळण्याचे स्वातंत्र्य राज्यघटना देत नाही. असे ते म्हणाले. चालू वर्ष हे जायकवाडी धरणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. जायकवाडी धरणाने मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मोलाची मदत झाली. तरीही, मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. डॉ. शंकरराव चव्हाण केंद्राच्या वतीने मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या सहाय्याने काम केले जाणार आहे. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. मराठवाड्याचे प्रचलित रूप बदलून मराठवाडा एक विकसित प्रदेश म्हणून पुढे आणणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठ डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील चारही जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर विकासासाठीचा कृति-आराखडा तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार आहे. असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्राचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात प्रा. नंद्कुमार बोधगिरे, प्रा. शालीनी कदम, प्रा. बाबुराव जाधव, प्रा. पी. विठ्ठल, प्रा. भाऊसाहेब आदमाने, संदीप जाधव, तात्याराव पवळे, हरीश पाटील, गौतम गायकवाड, लक्ष्मण जाधव, राम जोगदंड, अण्णा पेरुका आदी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते.
मा.शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुख्याध्यापकांना कारावास
नांदेड/प्रतिनिधी-लातूर येथील शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे शहरालगत असलेल्या पंकजनगर, धनेगाव येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर निवृत्ती पावले यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात जळबा लक्ष्मण कानगुलवार व विजयकुमार अंबाजी दवणे यांनी सेवेत पूर्ववत रुजू करून घेणे व थकीत वेतन मिळावे यासाठी मा. शाळा न्यायाधिकरण, लातूर येथे अंमलबजावणी अर्ज क्र. 32/2024 व 33/2024 दाखल केले होते. न्यायाधिकरणाने संबंधितांना सेवेत रुजू करून घेऊन थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते.तथापि, आदेशाची अंमलबजावणी न केल्याने मुख्याध्यापक सुधाकर पावले यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानुसार त्यांना अटक करून दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी मा. शाळा न्यायाधिकरण, लातूर येथे हजर करण्यात आले. न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे व न्यायालयात सिव्हिल तुरुंगाची व्यवस्था नसल्याने त्यांना दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्यांची रवानगी चार दिवसांसाठी जिल्हा कारागृह, नांदेड (लातूर रोड) येथे करण्यात आली होती.या प्रकरणात फिर्यादींच्या वतीने ऍड. नागेश एल. कुलकर्णी यांनी काम पाहिले.











0 टिप्पण्या