Header Ads Widget

1) वीज कोसळून 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू 2)किनवट वनविभागावर खंडणीचा गंभीर आरोप!


 वीज कोसळून 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू 

शिळवणी येथील घटना 

देगलूर/प्रतिनिधी-तालुक्यातील शिळवणी गाव परिसरात सोमवारी (दि.16) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात 16 वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिळवणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीपिका संजय राठोड (वय 16) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिळवणी येथील शेतकरी मिलिंद देशमुख यांच्या शेतात गावातील अनेक मजूर काम करत होते. त्याच ठिकाणी दीपिका संजय राठोड ही मुलगी गेली असता, सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.यावेळी अचानक दीपिकाच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सोमवारी सायंकाळी देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीटसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी व उन्हाळी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.घटनेची माहिती मिळताच मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली.


किनवट वनविभागावर खंडणीचा गंभीर आरोप!

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

माहूर/प्रतिनिधी-किनवट तालुक्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, ट्रॅक्टर चालकाकडून 50,000/- खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी माकपाचे जिल्हा सचिव कॉ शंकर सिडाम यांच्या कडून करण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद आरोपानुसार, दि.11 मार्च 2026 रोजी मध्यरात्री वन विभागाच्या किनवट येथील एका ट्रॅक्टरला अडवून कारवाई करण्यात आली.यावेळी चालकाकडे आवश्यक परवाना नसल्याचे कारण देत संबंधित वनकर्मचाऱ्यांनी त्याला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच बंदूक दाखवून धमकी देऊन ट्रॅक्टर जप्त करण्याची भीती दाखवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.यानंतर संबंधित चालकाला व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप असून, 50,000/- दे, नाहीतर केस टाकू” असा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात गावातील काही मध्यस्थांच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचेही समोर येत आहे. तक्रारीनुसार, एका व्यक्तीमार्फत ट्रॅक्टर मालकाकडून 50,000/- रक्कम देण्यात आल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम अधिकृत पावतीशिवाय घेतल्याचा आरोप आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, “हा सरळ सरळ खंडणीचा प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया शंकर सिडाम यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही सांगितले जाते.दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]