Header Ads Widget

होय रे भाऊ! टंचाई नाही म्हणत्यात…तर मग रांगा का?


 होय रे भाऊ! टंचाई नाही म्हणत्यात…तर मग रांगा का?

“काहीही टंचाई नाही,” असा ठाम दावा सत्ताधारी नेते करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वजण एकाच सुरात सांगत आहेत. देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे. उलट, विरोधक युद्धाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत, अशी टीकाही केली जात आहे. पण प्रश्न साधा आहे; जर टंचाई नाही, तर या रांगा का लागत आहेत?

अमेरिका-इराण-इराक या युद्धाच्या सावटाने जगभरातील ऊर्जा बाजार अस्थिर झाले आहेत. त्या युद्धाला अवघे काही दिवस झाले आणि भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाईची चर्चा सुरू झाली. मुंबईसारख्या शहरात युद्धाच्या पाचव्या-सहाव्या दिवसापासूनच परिस्थितीची झळ जाणवू लागली. गॅसअभावी सुमारे वीस-पंचवीस टक्के हॉटेल्स बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली.घराघरात स्वयंपाकासाठी लागणारा गॅस संपत चालल्याने लोकांनी गॅस एजन्सीसमोर रांगा लावायला सुरुवात केली. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी आणखी वाढली. परिणामी, गेल्या दहा-बारा दिवसांपासून अनेक ठिकाणी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा दिसू लागल्या.

सामान्य माणसाला कागदावरचा साठा दिसत नाही; त्याला दिसते ती एजन्सीसमोर उभी असलेली रांग. पेट्रोल पंपावर मर्यादित पुरवठा, गॅससाठीची प्रतीक्षा आणि वाढती चिंता, हेच त्याचे वास्तव आहे.मराठवाड्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक उद्योग गॅस अभावी बंद पडल्याची परिस्थिती आहे. उत्पादन थांबलं, कामगारांना सुट्टी देण्याची वेळ आली आणि व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागली.

अशा वेळी सरकार “टंचाई नाही” असे सांगत असेल, तर नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर टंचाई नाही, तर हॉटेल्स बंद का पडत आहेत? उद्योग थांबण्याची वेळ का येते आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सामान्य माणूस गॅससाठी रांगेत का उभा आहे? वास्तव नाकारून समस्या सुटत नाही. सरकारने परिस्थिती स्पष्टपणे सांगितली पाहिजे. साठा किती आहे, पुरवठ्यात अडथळा कुठे येतो आहे आणि तो सुरळीत करण्यासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे, हे जनतेला कळायला हवे.

कारण शेवटी नागरिकांना भाषणांपेक्षा वास्तव महत्त्वाचे वाटते. पेट्रोल पंपावर उभा असलेला चालक, गॅससाठी एजन्सीसमोर थांबलेली गृहिणी आणि बंद पडलेल्या कारखान्याचा कामगार यांना “टंचाई नाही” या वाक्याने समाधान मिळत नाही. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आज एकच प्रश्न विचारतो आहे. “होय रे भाऊ! टंचाई नाही म्हणत्यात…तर मग रांगा का?”

- दृष्टीक्षेप

प्रदीप नागापूरकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]