भाजपतर्फे स्वीकृत सदस्यपदी डॉ.देवसरकर, दिलीप कंदकुर्ते, अमितसिंह तेहरा, आशुतोष जोशी, सुप्रिया पाटील यांची निवड
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून डॉ.अंकुश देवसरकर, दिलीप कंदकुर्ते, अमितसिंह तेहरा, आशुतोष जोशी, सुप्रिया पाटील यांच्या नावाची शिफारस झाल्याने त्यांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. या निवडीवरुन भाजपातील निष्टावंतांमध्ये नाराजी पसरली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सौ.कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) सकाळी महापालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून स्वीकृत सदस्यपदासाठी मुन्ना अब्बास हुसेन व ऍड.शेख बिलाल तसेच एमआयएमकडून माजी नगरसेवक मो.नासेर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नावे बाहेर येवू नयेत याची काळजी घेत भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी बंद लिफाफ्यात पाच जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली. सर्वसाधारण सभेत डॉ.अंकुश देवसरकर, दिलीप कंदकुर्ते, अमितसिंह तेहरा, आशुतोष जोशी, सुप्रिया पाटील (भाजप), ऍड.शेख बिलाल, मुन्ना अब्बास हुसेन कॉंग्रेस-वंचित आघाडी व एमआयएमचे मो.नासेर यांची महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याचे महापौर कविता मुळे यांनी जाहीर केले. शिवाजीनगर प्रभागातून डॉ.अंकुश देवसरकर व दिलीप कंदकुर्ते यांना भाजपने स्वीकृत सदस्यपदासाठी संधी दिली आहे. दिलीप कंदकुर्ते यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढविली होती. तिन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. स्वीकृत सदस्यपदासाठी ते इच्छुक नव्हते. त्यांनी आपले पुत्र कुणाल कंदकुर्ते यांच्या नावासाठी आग्रह होता. परंतु भाजपने दिलीप कंदकुर्ते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला. यापूर्वी त्यांनी तीन वेळा महापालिकेचे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले आहे. अमितसिंह तेहरा, आशुतोष जोशी व डॉ. अंकुश देवसरकर यांची नावे बघुन भाजपातील अनेकांना धक्काच बसला आहे. स्वीकृत सदस्यासाठी ऍड.चैतन्य देशमुख, ऍड. दिलीप ठाकूर, सुषमा थोरात, विश्वास कदम यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. ऐनवेळी ही सगळी नावे मागे पडून नवीन उपर्यांना संधी देण्यात आली आहे. डॉ.अंकुश देवसरकर यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेस, शिवसेना शिंदे गट व आता भाजप असा झालेला आहे. डॉ. देवसरकर हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांना महापालिकेचे स्वीकृत सदस्य पदाची लॉटरी लागली आहे. हे पाचही जण माजी खा.अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

0 टिप्पण्या