Header Ads Widget

दादा जरा सांगा ना यांना खडसावून...!

 


दादा जरा सांगा ना यांना खडसावून...!

“दादा असते तर...!” आज महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात उमटणारी ही हळवी पण तितकीच संतप्त प्रतिक्रिया आहे. रोखठोक बोलणारे, चुका सहन न करणारे आणि गरज पडली तर आपल्या लोकांनाही खडसावून सांगणारे अजित पवार आज असते, तर या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी कोणती भूमिका घेतली असती, याचीच चर्चा सर्वत्र रंगत आहे.

“नेमकं काय घडलं त्या दिवशी?”

“खरंच हा अपघात होता की काहीतरी वेगळं?”

“इतका वेळ का लागत आहे चौकशीला?”

हे प्रश्न आता केवळ विरोधकांचे नाहीत, तर सामान्य जनतेचे झाले आहेत.

28 जानेवारीचा तो दिवस...एका विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दादांसारख्या ठाम नेत्याचा असा अचानक अंत होणे अनेकांना अजूनही पटत नाही. सुरुवातीला सांगितलं गेलं “धुक्यामुळे अपघात झाला.” काही वेळात मृतांची संख्या बदलली. अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात विसंगती दिसू लागली.

“मग खरं काय?”

हा साधा प्रश्न आहे. पण उत्तर मात्र गुंतागुंतीचं होत चाललं आहे.

आज तंत्रज्ञानाच्या युगात सत्य लपवणं सोपं राहिलेलं नाही. काही नागरिकांनी अपघाताच्या वेळी केलेल्या व्हिडिओ शूटिंगमुळे अनेक बाबी समोर येऊ लागल्या. त्या दृश्यांमध्ये परिस्थिती इतकी भयानक नव्हती, असे अनेकांचे मत आहे. मग अचानक इतकी मोठी दुर्घटना कशी घडली?

“वैमानिक बदलला गेला होता का ऐनवेळी?”

“विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन होतं का?”

“विमान एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत का आढळलं?”

हे प्रश्न केवळ तांत्रिक नाहीत, तर या अपघाताच्या मुळाशी जाणारे आहेत.

दादांचे पुतणे आणि आ.रोहित पवार यांनीही सादरीकरण करून काही गंभीर शंका व्यक्त केल्या. पण त्यानंतर काय झालं?

“सरकारकडून ठोस उत्तर आलं का?”

“तपास यंत्रणांनी स्पष्ट भूमिका घेतली का?”

उत्तर आहे, नाही.

याहून धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासही पोलीस तयार नाहीत, अशी माहिती समोर येते.

“एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत असं झालं असतं का?”

हा प्रश्न जनतेच्या मनात खोलवर घर करून बसला आहे.

याच दिवशी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. इतक्या मोठ्या घटनेवर फक्त शोकप्रस्ताव मांडून पुढे जाणं योग्य होतं का?

“चर्चा का टाळली जाते आहे?”

“स्थगन प्रस्ताव का नाकारला गेला?”

“अल्पकालीन चर्चा मंजूर होऊनही ती पुढे ढकलली जातेय का?”

विधान परिषदेतही हे प्रश्न जोरात उपस्थित झाले. आमदार अमोल मिटकरी आणि इतर सदस्यांनी सभापतींकडे याबाबत सवाल उपस्थित केले. पण तरीही स्पष्ट चर्चा होत नाही, हीच वस्तुस्थिती आहे.

“मग लोकशाहीत प्रश्न विचारायचेच नाहीत का?”

“उत्तरदायित्व कुठे आहे?”

दादा असते, तर त्यांनी नक्कीच यावर कठोर शब्दांत भूमिका घेतली असती.

“काम करा, नाहीतर बाजूला व्हा,” असा त्यांचा ठाम संदेश असायचा.

आज तोच संदेश या संपूर्ण व्यवस्थेला देण्याची गरज आहे.

कारण हे प्रकरण केवळ एका नेत्याच्या मृत्यूचं नाही. हे पारदर्शकतेचं, विश्वासाचं आणि शासनाच्या उत्तरदायित्वाचं आहे.

आज जनतेला फक्त एकच गोष्ट हवी आहे,सत्य.

ना राजकारण, ना आरोप-प्रत्यारोप...

फक्त स्पष्ट, निष्पक्ष आणि वेळेत होणारी चौकशी.

“दादा, जरा सांगा ना यांना खडसावून...”

ही केवळ भावना नाही, तर आजच्या परिस्थितीवरची तीव्र प्रतिक्रिया आहे.

दादांच्या शैलीतच सांगायचं तर 

गोंधळ नको, उत्तर द्या!

विलंब नको, चौकशी करा!

आणि सर्वात महत्त्वाचं

सत्य लपवू नका, ते समोर आणा!

हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

-दृष्टीक्षेप

प्रदीप नागापूरकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]